हतबल विद्यार्थ्यांचा सवाल
मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (एम.ए.) परीक्षेचा निकाल जाहीर होऊन दोन महिने झाले तरी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका न मिळाल्याने हजारो विद्यार्थ्यांना मोठय़ा मनस्तापाला सामोरे जावे लागते आहे.
एमएच्या भाग-२च्या द्वितीय सत्र परीक्षेचा निकाल सप्टेंबर महिन्यात जाहीर करण्यात आला. मात्र, पहिल्या आणि दुसऱ्या वषार्र्च्या एकत्रित गुणांची गोळाबेरीज असलेली गुणपत्रिका अद्याप विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे, हजारो विद्यार्थ्यांच्या परदेशातील शिक्षणाच्या संधी हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या वर्षी एम.ए.बरोबरच अनेक अभ्यासक्रमांच्या परीक्षा चांगल्याच लांबल्या. परिणामी त्यांचे निकाल सप्टेंबर महिन्यात जाहीर करण्यात आले. खरेतर जुलै-ऑगस्ट महिन्यातच एम.ए.च्या परीक्षेचा निकाल जाहीर केला जातो. परंतु, निकाल तब्बल दोन महिन्याने लांबला. त्यानंतर विद्यार्थ्यांना दोन्ही वर्षांच्या एकत्रित गुणांचा समावेश असलेली गुणपत्रिका मिळायला हवी होती. मात्र, ती अद्याप मिळालेली नाही.
पुनर्मूल्यांकनाचे निकाल तीन ते सहा महिने निकाल मिळत नाहीत. परंतु, नियमित परीक्षांचे निकाल लागल्यानंतर दोन ते तीन दिवसांत गुणपत्रिका मिळाल्या पाहिजे. पण, विद्यार्थ्यांना त्यासाठी महिनोन्महिने वाट पाहावी लागत असेल तर ते चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया एका विद्यार्थ्यांने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.
मुंबई विद्यापीठ आपल्या सर्व परीक्षांचे निकाल ऑनलाइन जाहीर करते. त्यानंतर निकालाची एक प्रत महाविद्यालयांकडे पाठविली जाते. त्यानंतर १५ दिवसांनी गुणपत्रिका छापून येतात, अशी आतापर्यंतची पद्धत होती. एखाद्या विद्यार्थ्यांला निकालाची प्रत अत्यंत तातडीने हवी असेल तर तो या प्रतीच्या फोटोकॉपीच्या आधारे प्रवेश मिळवितो, पण हे झाले इथल्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे. परंतु परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय, असा सवाल ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने’चे (मनविसे) संतोष गांगुर्डे यांनी केला. त्यांनी या विलंबाचे खापर विद्यापीठाच्या संगणक विभाग आणि परीक्षा विभागातील समन्वयाच्या अभावावर फोडले. त्यांच्यात समन्वय नसल्याने गुणपत्रिका छापण्यास विलंब होत आहे. त्यामुळे, विद्यापीठाने या विभागांमध्ये तातडीने समन्वय साधून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.