या हृदयाचे त्या हृदयापर्यंत लवकर पोहोचते,’ असे म्हणतात.. मुंबई-पुणे पोलीस आणि विमानतळ अधिकाऱ्यांनी सोमवारी हे वाक्य आपल्या कौशल्यपूर्ण नियोजनाने अक्षरश: खरे करून दाखविले. तेही केवळ भावनाच नव्हे तर प्रत्यक्ष ‘हृदय’ पोहोचवून. तेही अवघ्या ६० मिनिटात. पुण्याहून मुंबईला अवघ्या तासाभरात प्रत्यारोपणासाठी आलेल्या ‘हृदया’मुळे एका २२ वर्षीय रूग्णाचे प्राण वाचविण्यात तज्ज्ञांना यश आले आहे.
तब्बल ४०वर्षांनी मुंबईत करण्यात आलेल्या या यशस्वी हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रियेमध्ये डॉक्टरांनी मोलाची भूमिका तर बजावली आहेच. परंतु, पुण्यातील जहांगीर रूग्णालयातून हे हृदय मुंबईतील फोर्टीस रूग्णालयापर्यंत सुखरूपपणे पोहोचविणाऱ्या पोलीस आणि विमानतळ प्राधिकरणाच्या नियोजन कौशल्यही कौतुकास पात्र ठरले आहे. या अनोख्या शस्त्रक्रियेमुळे सोमवारचा ‘जागतिक अवयव दान दिन’ सार्थकी लागल्याचे समाधान वैद्यकीय क्षेत्रात व्यक्त होते आहे. हृदयाचा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी पुण्याहून हवाईमार्गे निघालेले ‘हृदय’ मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांवरून प्रवास करत अवघ्या तासाभरात सुखरूपपणे रूग्णालयापर्यंत पोहोचवून एक जीव वाचविण्यास त्यामुळे यश आले आहे.
या २२ वर्षीय रूग्णाच्या हृदय आणि मेंदूला जोडणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये रक्त साकळल्याने वाहिनीवर दाब पडून मेंदूत रक्तस्त्राव सुरू झाला होता. त्यामुळे त्याच्यावर ही शस्त्रक्रिया तातडीने करणे आवश्यक होते. पुण्यात अवयव दान करणाऱ्या एका ४२ वर्षांच्या रूग्णाचे हृदय या रूग्णाला उपलब्ध झाल्यामुळे त्याच्या जगण्याच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु, ही शस्त्रक्रिया तातडीने करणे आवश्यक होते.
रूग्णाच्या नातेवाईकांकडून योग्य त्या परवानग्या घेतल्यानंतर सोमवारी दुपारी शस्त्रक्रियेची तयारी करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे या संदर्भात पुणे-मुंबई पोलिस आणि विमानतळ प्राधिकरणाला सोमवारी सकाळी १०च्या सुमारास कल्पना देण्यात आली होती. यातली गंभीरता ओळखून अवघ्या २० मिनिटात पोलिसांनी आणि प्राधिकरणाने याला मंजुरी देत नियोजन केले.
विशेष मार्गिकेचे नियोजन
त्यासाठी पुणे-मुंबई दरम्यान विशेष मार्गिकेचे नियोजन करण्यात आले. यात पुणे-मुंबईतील पोलिसांबरोबरच विमानतळ प्राधिकरणाचीही मोलाची साथ लाभली. परिणामी पुण्याचे जहांगीर रूग्णालय ते मुंबईतील मुलुंड येथील फोर्टीस रुग्णालयापर्यंतचा हृदयाचा प्रवास अवघ्या ६० मिनिटांत पूर्ण करणे शक्य झाले. मुंबई विमानतळ ते मुलुंड पर्यंतचा १९ किलोमीटरचा एरवी वाहतुकीने गजबजलेला मार्ग वाहतूक पोलिसांनी मोकळा केला. त्यामुळे, अवघ्या १८ मिनिटांत हृदय रूग्णालयात पोहोचविणे शक्य झाले. हृदय शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. अन्वय मुळे यांनी या हृदयाचा ताबा घेतला. दुपारच्या सुमारास ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

वेळेच्या काटेकोर नियोजनामुळेच यश
वेळेचे अत्यंत काटेकोर नियोजन करून आम्ही पुणे ते मुंबई दरम्यान ग्रीन कॉरिडॉर तयार केला होता. हे हृदय पुण्याहून विमानाने मुंबईला आणण्यात आले. त्यानंतर सांताक्रुझ विमानतळाच्या ८ क्रमांकाच्या प्रवेशद्वारापासून मिलिटरी रोड, सांताक्रुझ चेंबूर लिंक रोड, छेडा नगर, पूर्व द्रुतगती मार्ग, ऐरोली जंक्शन या मार्गाने ते फोर्टीस रूग्णालयात आणण्यात आले. आमचे प्रयत्न एक अमुल्य जीव वाचविण्यास कारणी लागल्याचे समाधान आम्हाला आहे, अशा शब्दांत पोलिस सहआयुक्त (वाहतूक) मिलिंद भारंबे यांनी मुंबईकरांनीही या नियोजनाला अप्रत्यक्षपणे दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.