मध्य रेल्वेच्या प्रवाशांसमोरील वाढत्या अडचणींवरचा एक उपाय समोर दिसत असूनही मुंबई रेल्वे विकास महामंडळ किंवा मध्य रेल्वे या उपायाची अमलबजावणी करण्यात असमर्थ ठरत आहे. कुर्ला ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस यादरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेसह परळ टर्मिनस बांधण्याचाो प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे गेले सहा महिने पडून आहे. आता आचारसंहिता लागल्याने एवढय़ात तरी या प्रस्तावावर निर्णय होणार नसल्याचे समजते. यात रेल्वे विकास महामंडळ किंवा मध्य रेल्वे यांचा दोष नसून रेल्वे बोर्डाकडून या उपायाबाबतच्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी न मिळाल्याने हा प्रस्ताव रखडला आहे.  
मध्य रेल्वेवर पाचव्या व सहाव्या मार्गाचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे होणार आहे. सध्या कल्याण ते दिवा आणि ठाणे ते लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकांदरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेचे काम झाले आहे. तर दिवा-ठाणे या स्थानकांदरम्यानचे काम डिसेंबर २०१५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र या मार्गिका मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत झाल्याशिवाय उपनगरीय प्रवाशांना त्याचा फायदा होणार नाही. परळ ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस या दरम्यान विस्तारीकरणाला जागा नसल्याने मध्य रेल्वेने पाचव्या व सहाव्या रेल्वेमार्गाच्या कामाबरोबरच परळ टर्मिनस बांधण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला. आता कुर्ला ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस या स्थानकांदरम्यानच्या पाचव्या व सहाव्या मार्गिकेचे काम दोन टप्प्यांत होईल.
या टप्प्याचे काम झाल्यास परळ टर्मिनसची उभारणी करता येणार आहे. उपनगरीय गाडय़ांसाठीच्या या टर्मिनसमुळे दादर स्थानकावरील गर्दीचा भार कमी होईल. मात्र गेल्या सहा महिन्यांत रेल्वे बोर्डाने या प्रस्तावावर कोणताही निर्णय दिलेला नाही. कुर्ला-परळ दरम्यानच्या विस्तारीकरणाचे काम एमआरव्हीसी मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागामार्फत करणार आहे. याबाबत रेल्वे बोर्डाचे सदस्य सुबोध जैन यांच्याशी संपर्क साधला असता, हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाच्या विचाराधीन असून त्याबाबत अधिक माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे
त्यांनी सांगितले.