७५ गुणांऐवजी केवळ ५० गुणांचीच प्रश्नपत्रिका

मुंबई विद्यापीठाच्या बीएमएम अभ्यासक्रमाच्या परीक्षेदरम्यान शनिवारी विद्यार्थ्यांच्या हाती कमी गुणांची प्रश्नपत्रिका मिळाल्याने ठाण्यातील अनेक परीक्षा केंद्रांत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर परीक्षेच्या एक तास अगोदर ‘बिझनेस अ‍ॅण्ड मॅगझिन जर्नालिझम’ या विषयाची प्रश्नपत्रिका महाविद्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या. मात्र ७५ गुणांच्या या परीक्षेसाठी केवळ ५० गुणांची प्रश्नपत्रिका प्राप्त झाल्याने परीक्षा केंद्रांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. महाविद्यालयांनी मुंबई विद्यापीठाकडे या विषयाची तक्रार केल्यानंतर पुन्हा नवी ७५ गुणांची प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांकडे पाठवण्यात आल्या. मात्र त्यासाठी सुमारे एक तासाचा कालावधी लागल्याने दुपारी ३ वाजता सुरू झालेली ही परीक्षा सुमारे एक तास १५ मिनिटे उशिरा म्हणजे सव्वाचार वाजता सुरू झाली. यामुळे परीक्षेसाठी दाखल झालेले विद्यार्थी चांगलेच हवालदिल झाले होते.

मुंबई विद्यापीठाच्या बीएमएमच्या अभ्याक्रमाच्या सहाव्या सत्राची परीक्षा सध्या सुरू असून ठाण्यातील विविध केंद्रांत ही परीक्षा सुरू आहे. शनिवारी पत्रकारिता विभागाच्या व्यवसाय आणि मासिके पत्रकारिता (बिझनेस अ‍ॅण्ड मॅगेझिन जर्नालिझम) या विषयाची लेखी परीक्षा होती. हा विषय ७५ गुणांचा असून त्यासाठी अडीच तासांचा कालावधी होता. दुपारी परीक्षेच्या दीड तास आगोदर विद्यापीठाकडून ऑनलाइन पद्धतीने परीक्षा केंद्रामध्ये या विषयाची गुणपत्रिका प्राप्त झाल्या. मात्र ही प्रश्नपत्रिका केवळ ५० गुणांची असल्याचे लक्षात आल्यानंतर परीक्षा केंद्रांत एकच गोंधळ उडाला. मात्र विद्यापीठाच्या परीक्षा विभागाशी संपर्क साधून अनेक परीक्षा केंद्रे असलेल्या महाविद्यालयांनी ही बाब नजरेस आणून दिली. त्या वेळी संकेतस्थळावरून चुकीच्या प्रश्नपत्रिका वितरित झाल्याची कबुली परीक्षा विभागाकडून देण्यात आले. आणि त्यानंतर आठ पानांची आणि ७५ गुणांची प्रश्नपत्रिका विद्यापीठाकडून उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर सव्वातीन वाजता ही प्रश्नपत्रिका विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाली. त्यानंतर ही प्रश्नपत्रिकांची छपाई करून त्या विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आल्या. त्यासाठी सुमारे अर्धा तास अधिकचा वेळ जाऊन परीक्षा सव्वाचार वाजता सुरू झाली.

या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. या परीक्षेसाठी मुंबई विद्यापीठातून सुमारे चार हजार विद्यार्थी परीक्षा देत असून ठाण्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयांतील परीक्षा केंद्रांतून हजारो विद्यार्थी परीक्षा देत आहेत. पेपरफुटीच्या घटना टाळण्यासाठी विद्यापीठाकडून अत्यंत कडक शिस्तीमध्ये अत्याधुनिक ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करून प्रश्नपत्रिका वितरित करण्यात येतात. मात्र त्यातील तांत्रिक चुकांमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रासदेखील सहन करावा लागतो आहे.

ठाण्यातील काही महाविद्यालयांतील परीक्षा केंद्रांमध्ये चुकीच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना वितरितही करण्यात आल्या होत्या. मुलांनी उत्तरपत्रिका लिहिण्यास सुरुवात केल्यानंतर ही चूक लक्षात आल्यानंतर या विद्यार्थ्यांचे या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दोन्ही काढून घेण्यात आल्या. त्यानंतर दुरुस्त केलेल्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका देण्यात आल्या. केंद्रात हजारो उत्तरपत्रिकांचे नुकसान झाल्याची माहिती, परीक्षा केंद्रांतील प्राध्यापकांनी दिली.