मुंबई विद्यापीठाच्या नियोजनशून्य कारभाराचा नवा नमुना

पदवी परीक्षांचे निकाल लांबल्याने बाहेरील शिक्षणसंस्थांमधील प्रवेशांवर विद्यार्थ्यांना पाणी सोडावे लागत आहेच. परंतु, त्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा खेळखंडोबा मांडणारे मुंबई विद्यापीठही आपल्या विद्यार्थ्यांकरिता कळ सोसायला तयार नाही. विद्यापीठातील काही विभागांना आपल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशांची इतकी घाई लागली आहे की विद्यार्थ्यांचा रखडलेला निकाल हाती येण्याचीही वाट बघायला ते तयार नाहीत. या विभागांनी प्रवेश प्रक्रिया सुरू केल्याने विद्यार्थी हैराण झाले आहेत.

‘ऑनस्क्रीन मूल्यांकना’च्या निर्णयामुळे एकीकडे लाखो विद्यार्थ्यांचे निकाल रखडले आहेत. तर दुसरीकडे जाहीर निकालांमध्येही अनेक विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवले आहेत. त्यात विद्यापीठाच्याच विविध शिक्षण विभागांनी प्रवेश प्रक्रिया सुरू केल्याने या विद्यार्थ्यांची अवस्था ‘आई जेवू घाली ना..’ सारखी झाली आहे.

विज्ञान शाखेतील सांख्यिकी विषयाचे निकाल ३१ जुलै रोजी जाहीर करण्यात आले. परंतु खालसा महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. निकाल राखीव ठेवण्याचे कारण शोधण्याकरिता विद्यार्थी वारंवार परीक्षा विभागात खेटे घालत आहेत. ‘निकाल जाहीर झाल्यापासून गेल्या पंधरा दिवसांत सात-आठ वेळा परीक्षा विभागात गेलो. परंतु दर वेळेस आम्हाला एक अर्ज लिहून द्या, सांगितले जाते. नंतर एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे पळविले जाते. निकाल राखीव का ठेवला, अशी विचारणा केल्यास काहीही उत्तर दिले जात नाही. संध्याकाळी सहानंतर, ‘दोन दिवसांनी या’ असे सांगितले जाते. हे आम्ही गेले पंधरा दिवस ऐकत आहोत,’ असा शब्दांत एका विद्यार्थ्यांने या त्रासाचा पाढा वाचला.

विद्यापीठाच्या सांख्यिकी विषयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू झाले आहेत. येत्या २१ तारखेला ही प्रवेशप्रक्रिया संपणार आहे. ‘विद्यापीठाला प्रवेशप्रक्रिया पुढे ढकलण्याची विनंती आम्ही केली. बाहेरच्या विद्यापीठातून प्रवेश घेणारेही विद्यार्थी आहेत. त्यामुळे फक्त तुमच्यासाठी ही प्रक्रिया पुढे ढकलली जाणार नाही. तुमचे निकाल जाहीर झाल्यानंतर जागा वाढवून तुम्हाला घेण्यात येईल,’ असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. सांख्यिकी विषयासाठी ६० जागा आहेत. त्या कधीच वाढविल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यापीठाच्या आश्वासनावर आम्ही कसा विश्वास ठेवायचा. तेव्हा माझे हे वर्ष आता वायाच गेले आहे,’ अशा शब्दांत एका विद्यार्थिनीने हतबलता व्यक्त केली.

‘प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत २१ ऑगस्टपर्यंत आहे. तोपर्यंत जर विद्यार्थ्यांचे राखीव ठेवण्यात आलेले निकाल जाहीर झाले तर ठीक आहे. अन्यथा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून मुदत वाढवण्याबाबत निर्णय घेतला जाईल. संपूर्ण प्रवेशप्रक्रिया संपून महाविद्यालये सुरू व्हायला सप्टेंबर महिना उजाडेल. त्यामुळे प्रवेशप्रक्रिया लांबणीवर टाकली तर विद्यार्थ्यांचेच शैक्षणिक नुकसान होईल. त्यामुळे नेमका काय निर्णय घ्यावा याबाबत आम्हीही संभ्रमात आहोत. तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीनेच प्रवेशप्रक्रियेत बदल केले जातील’, असे मुंबई विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागाचे प्रमुख संतोष गीते यांनी सांगितले आहे.

हेलपाटे घालण्याशिवाय पर्याय नाही

विज्ञान शाखेतील संगणक विषयाचा निकालही ३१ जुलै रोजी जाहीर झाला आहे. परंतु अनेक विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. ‘गेले सात दिवस मी सलग विद्यापीठाच्या चकरा मारत आहे. दर वेळेस ‘थांबा’ असे सांगून रात्री अगदी नऊ वाजेपर्यंत रखडवतात. त्यानंतर दोन दिवसांनी या, असे सांगून परत पाठवतात. या विभागातून त्या विभागात निकाल मिळवण्यासाठी हेलपाटे घालून आता मी थकले आहे. परंतु विद्यापीठापुढे हाजी हाजी करण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही,’ असे भवन्समधील एका विद्यार्थिनीने सांगितले.