२२ लाखांपैकी अवघ्या ५० हजार उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण; जुलैपूर्वी निकाल जाहीर होणे कठीण

परीक्षा संपून दोन महिने झाले तरी मुंबई विद्यापीठाच्या ४००च्या हून अधिक विषयांच्या संगणकीय मूल्यांकनाच्या कामाने जोर पकडला नसल्याने निकालांच्या रखडपट्टीची मालिका यंदाच्या वर्षीही सुरूच राहणार आहे. मूल्यांकनाचे काम फारच लांबल्याने यंदा जुलै महिन्याच्या आधी एकाही महत्त्वाच्या विषयाच्या परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता नाही.

२८ एप्रिलला विद्यापीठाने परीक्षा पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने मार्च-एप्रिल या पहिल्या सत्रामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सर्व विद्या शाखांच्या विविध ४०६ परीक्षांच्या २२ लाख उत्तरपत्रिकांचे संगणकीय मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ‘मेरीटट्रॅक’ या तांत्रिक सहकार्य पुरविणाऱ्या कंपनीची निवडही केली. परंतु एक महिना होत आला तरी २२ लाखांपैकी केवळ ५० हजार उत्तरपत्रिकांचेच मूल्यांकन होऊ शकले आहे.

विद्यापीठामध्ये आजमितीस अभियांत्रिकी विद्याशाखेतील २ लाख उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन संगणकावर होते. यंदापासून हीच पद्धत इतरही विद्या शाखांना लागू करण्यात येणार आहे. यामुळे निकाल जलदगतीने लागेल, परीक्षा पद्धतीमध्ये अधिक पारदर्शकता येईल, मूल्यमापनाची विश्वासार्हता वाढेल आणि मानवी हस्तक्षेप टळेल, अशी अपेक्षा होती. मात्र हा निर्णय घेण्यास झालेला विलंब, अपुरे मनुष्यबळ यामुळे या वर्षी तरी जलदगतीने निकाल लावण्याच्या उद्देशाला हरताळ फासला जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठाला परीक्षा झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत काही करून निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे. परंतु आता ४५ दिवस तर सोडाच ऑगस्टपर्यंत निकाल जाहीर झाले तरी पुरे, अशी भावना प्राध्यापकांमध्ये व्यक्त होत आहे.

‘आम्ही १२० विषयांच्या मूल्यांकनाच्या कामाला सुरुवात केली आहे. तसेच आतापर्यंत ५० हजार उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन झाले आहे,’ अशी माहिती परीक्षा नियंत्रक दीपक वसावे यांनी दिली. उत्तरपत्रिका स्कॅन करून अपलोड झाल्यावरच आम्ही प्राध्यापकांना पासवर्ड देतो आहोत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. मात्र विद्यापीठ प्रत्येक सत्रात तब्बल ४०६ परीक्षा घेते. या विषयांच्या मिळून २२ लाख उत्तरपत्रिका दरवर्षी तपासाव्या लागतात. त्या तुलनेत ५० हजार हा आकडा कुठेच नाही. त्यातच प्राध्यापकांच्या विरोधामुळे हे काम वेळेत होईल की नाही, अशी भीती प्राचार्याना भेडसावते आहे.

‘नेटवर्क’चा अडथळा

दुसरीकडे मूल्यांकनाकरिता स्कॅन झालेल्या उत्तरपत्रिका मिळूनही अनेक प्राध्यापकांना तांत्रिक अडचणीमुळे नेहमीच्या क्षमतेने काम करणे शक्य होत नाही आहे. यात नेटवर्कची समस्या हा मोठा अडचणीचा मुद्दा ठरतो आहे. पासवर्ड नसणे, नेटवर्कचा प्रश्न यावर कुलगुरूंच्या बैठकीत प्राध्यापकांनी प्रश्नही उपस्थित केले होते. मात्र काहीच तोडगा निघाला नाही. विद्यापीठाकडून उत्तरपत्रिकांच्या स्कॅनिंगच्या कामालाही विलंब होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

विलंब का?

सुरुवातीला प्रतिसाद न मिळाल्यामुळे विद्यापीठाला या कामासाठी आर्थिक साहाय्य पुरविणाऱ्या कंपनीच्या निवडीकरिता दोन वेळा निविदा प्रक्रिया राबवावी लागली होती. दुसऱ्यांदा मुदतवाढ दिल्यानंतर मात्र तीन कंपन्यांनी या कामासाठी प्रतिसाद दिला. अखेर निविदा प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत मे महिना उजाडला.