कुर्ला येथे एका शाळेतील महिला शिक्षिकेने वरिष्ठांनी बुरखा व हिजाब काढण्यास सांगितल्याने आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचे कारण देत बुधवारी राजीनामा दिला आहे.

शबिना खान नाझनीन (२५) असे या शिक्षिकेचे नाव असून या शिक्षिकेचा राजीनामा शाळा व्यवस्थापनाने स्वीकारलेला नसून यावर अंतिम निर्णय पुढील आठवडय़ात घेणार असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले.

नाझनीन यांनी त्यांच्या शाळेत नव्याने रुजू झालेल्या एका वरिष्ठ सहकाऱ्याच्या एका सूचनेवर आक्षेप घेतला आहे. या महिलेच्या म्हणण्याप्रमाणे या वरिष्ठ सहकाऱ्याने आपल्याला शालेय तासिकांच्या काळात बुरखा व हिजाब उतरवण्यास सांगितले. त्यांचे असे सांगणे आपणांस अजिबात योग्य वाटलेले नसून यामुळे माझ्या धार्मिक भावना दुखावल्याचे या महिलेने स्पष्ट केले.

तसेच याबाबत मुख्य शिक्षिका आणि मुख्याध्यापक यांना वारंवार सांगूनही त्यांनी याप्रकरणी लक्ष घातले नाही. अखेर मी बुधवारी आपल्या कामाचा राजीनामा शाळा व्यवस्थापनाकडे सुपूर्द केला असे या महिलेने माहिती देताना सांगितले.  या घटनेबाबत बोलताना शाळेचे मुख्याध्यापक विक्रम पिल्लई म्हणाले की, नाझनीन यांचा राजीनामा शालेय व्यवस्थापनाकडे पाठवला असून त्यावर निर्णय पुढील आठवडय़ात होईल.

मूलभूत अधिकारांचे हनन

नाझनीन यांनी जय हो फाऊंडेशन या सामाजिक संस्थेशी याप्रकरणाबाबत संपर्क साधला असून या संस्थेने याबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पत्र पाठवले आहे. शाळेत आपल्या सहकाऱ्याला असे करण्यास सांगणे हे त्या व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांचे हनन असून याने त्या महिलेच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. याप्रकरणी तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आम्ही तावडे यांना केली असल्याचे संस्थेचे विश्वस्त अदिल खत्री यांनी सांगितले.

या शाळेत मी तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान हा विषय शिकवत असून शाळेतील अन्य मुस्लीम शिक्षिका विद्यार्थ्यांना शिकवताना बुरखा व हिजाब काढून ठेवतात मात्र मी असे करण्यास तयार नाही.  –शबिना खान नाझनीन, महिला शिक्षिका