मराठा समाजाचे मोर्चे निघू लागल्यावर सुरुवातीच्या टप्प्यातच दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा (अ‍ॅट्रॉसिटी) गैरवापर या संवेदनशील विषयाला हात घातल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी रायगड जिल्ह्य़ात मराठा आरक्षणाची मागणी पुढे रेटून गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीपासून दूर गेलेल्या मराठा समाजाला पुन्हा जवळ करण्याची खेळी केली आहे.

, अशी मागणी शरद पवार यांनी करून राज्य सरकारपुढे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले. कारण स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यास आरक्षणाची ५० टक्क्यांच्या मर्यादा ओलांडली जाते. मराठा समाजाला आरक्षण देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वीच नवी मुंबईत दिली असली तरी हे आरक्षण कसे देणार हा प्रश्नच आहे. इतर मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाला धक्का लागल्यास हा समाज विरोधात जाण्याची भीती सत्ताधाऱ्यांना आहे. कोणत्याही आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण मिळावे ही पवारांची मागणी राजकीयदृष्टय़ा सत्ताधाऱ्यांकरिता अडचणीची ठरणारी आहे. मराठा आरक्षणाकरिता सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीने आग्रही मागणी लावून धरली होती. राष्ट्रवादीच्या दबावामुळेच २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय तत्कालीन पृथ्वीराज चव्हाण सरकारने घेतला होता. भाजप सरकारच्या काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयीन कचाटय़ात अडकला. सध्या गावोगावी निघणाऱ्या मोर्चामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. आरक्षण ही एक मोर्चामधील महत्त्वाची मागणी आहे. मराठा समाजाची नाराजी लक्षात घेऊन पवार यांनी या आरक्षणाच्या मुद्दय़ावर जोर दिला आहे.

मराठा समाजाच्या मोर्चाना मिळणारा प्रतिसाद बघून पवार यांनी दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या गैरवापराचा मुद्दा मांडला होता. पवार यांच्या विधानानंतर मराठा समाजातील साऱ्याच नेत्यांनी त्यांची री ओढली.

सध्या निघणारे मोर्चे हे भाजप नेत्यांनी कितीही इन्कार केला तरी सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील आहेत. याचा साहजिकच फटका भाजपला बसणार आहे. मराठा समाजातील तरुणवर्गात काँग्रेस आणि राष्ट्रवादीबद्दल संतप्त भावना आहे. याचा फायदा शिवसेनेला झाला असता. पण शिवसेनेच्या मुखपत्रात आलेल्या एका व्यंगचित्रामुळे मराठा समाजातील तरुणवर्गात शिवसेनेच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. भाजप आणि शिवसेनेबद्दल असलेल्या नाराजीचा फायदा अर्थातच राष्ट्रवादीला होऊ शकतो.

सेनेचे मराठाप्रेम बेगडी

मराठा समाजाच्या नाराजीच्या पाश्र्वभूमीवर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा, अशी मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या मुखपत्रातच मराठा समाजाची खिल्ली उडविणारे व्यंगचित्र प्रसिद्ध झाले, यावरून शिवसेनेचे मराठा समाजावरील प्रेम किती बेगडी आहे हे स्पष्ट होते, असा टोला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला.