मुंबईत शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा प्रचाराची सुरूवात केली. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रफुल्ल पटेल ,अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवार यांनी येणाऱ्या काळात महाराष्ट्रात समतोल पद्धतीने विकास साधण्याची गरज असल्याचे सांगितले. आघाडी सरकारच्या काळात शेती, उद्योग, कृषी या सर्वच क्षेत्रांत महाराष्ट्राने प्रगती केली असली तरी, हा विकास समतोल नसल्याची खंत यावेळी पवारांनी बोलून दाखविली.
यावेळी शरद पवारांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा आणि राष्ट्रवादीतील बंडखोरांचा चांगलाच समाचार घेतला. केरळच्या राज्यपालपदी माजी मुख्य न्यायाधीश पी. सथशिवम यांची नियुक्ती करण्याच्या निर्णयावर पवारांनी टीकेचे आसूड ओढले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेले नेते सत्तेच्या मोहापायी कोणत्याही थराला जाऊ शकतात, त्यामुळे ते गेले हे एका अर्थी बरेच झाले असे शरद पवारांनी सांगितले. यापूर्वी कार्यक्रमात बोलताना सुनिल तटकरे, छगन भुजबळ, अजित पवार , प्रफुल्ल पटेल या सर्वच नेत्यांनी सत्तेच्या काळात राष्ट्रवादीने केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला. तसेच भाजप राष्ट्रवादीविरुद्ध विनाकारण अपप्रचार करत असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले.