विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुजरातमधील उना येथे गोरक्षण समितीच्या कार्यकर्त्यांनी दलित तरुणांना केलेल्या मारहाणीवरून भाष्य केले आहे. लोकांचा जीव गमावून गायींचे रक्षण करता कामा नये असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. गुजरातमधील उना येथे गोहत्येच्या आरोपावरून चार दलितांना गोरक्षक दलाकडून ११ जुलैला मारहाण करण्यात आली होती. या व्यक्तिंवर मेलेल्या गायीचे चामडे काढण्याचा आरोप होता. आठवले इंडियन एक्सप्रेसशी बोलत होते.
रामदास आठवले म्हणाले की, दलितांनी त्यांच्याप्रमाणे बौद्ध धर्म स्वीकारायला हवा. याचसोबत त्यांनी बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख आणि यूपीच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्यावरही निशाणा साधला. मायावती यांनी अद्याप बौद्ध धर्म का स्वीकारला नाही, असेही ते म्हणाले. गोरक्षक चुकीचा मार्गाचे अवलंबन करत असल्याचे सांगत आठवले म्हणाले की, ही खूप गंभीर बाब आहे. मी गोरक्षकांना हेच सांगू इच्छितो की गायींच्या हत्या रोखण्यासाठी कायदा तयार करण्यात आलेला आहे. तुम्ही गायींचे रक्षण करा पण त्यासाठी माणसाची हत्या का करता? जर तुम्ही गायींचे रक्षण करणार तर मानवाचे रक्षण कोण करणार?
मायावती यांच्यावर साधला निशाणा:
मायावती यांनी अद्याप बौद्ध धर्म का स्वीकारला नाही. जर त्या खरंच आंबेडकरांना मानतात तर त्यांनी आत्तापर्यंत बौद्ध धर्म स्वीकारायला हवा होता. त्यांनी कित्येक वेळा धर्म परिवर्तन करणार असल्याची धमकी दिली होती. पण त्या अजूनही हिंदूच आहेत. दलितांनी बौद्ध धर्म स्वीकारायला हवा.