पुढील लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने राज्यात विकासकामांचा धडाका लावला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई-गोवा महामार्गासाठी ११ हजार ७४७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून हा संपूर्ण मार्ग हरित महामार्ग म्हणून विकसित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यात सध्या एक लाख सहा हजार कोटी रुपये खर्चाची विकासकामे प्रस्तावित असून त्यातील ६० हजार कोटी रुपये खर्चाची कामे सुरू झाली आहेत. त्याचप्रमाणे मुंबईच्या पूर्व किनाऱ्याचाही विकास करण्यात येणार असून दुबईतील ‘बुर्ज खलिफा’सारखी भव्य वास्तू मुंबईत उभारण्यात येणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी सांगितले.

केंद्र शासनाच्या विविध निधींतून महाराष्ट्रात चाललेल्या महामार्गाच्या कामांचा आढावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वांद्रे येथील कार्यालयात गडकरी यांनी घेतला. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) चंद्रकांतदादा पाटील या वेळी उपस्थित होते. मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीप्रमाणे पूर्व किनारपट्टीचाही विकास करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार या किनाऱ्यावर चौपाटी विकसित करण्यात येणार असून दुबईतील बुर्ज खलिफासारखी भव्य वास्तू उभारण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आल्याची माहिती गडकरी यांनी दिली. मुंबई पोर्ट ट्रस्टची साडेसातशे  हेक्टर जमीन पूर्व किनाऱ्याला लागून आहे. त्यामुळे या किनाऱ्यावर सध्याच्या मरिन ड्राइव्हपेक्षा तीनपट मरीन ड्राइव्ह विकसित करण्यात येणार आहे. पर्यटन दृष्टिकोनातून या किनारपट्टीचा विकास करण्यात येणार असून तेथे कन्व्हेन्शन सेंटर्स, हॉटेल्स उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गोवा महामार्गाला समांतर आणि डहाणू- वसई- अलिबाग- श्रीवर्धन- दाभोळ- गणपतीपुळे- रत्नागिरी- देवगड- मालवण ते वेंगुर्ला असा समुद्रकिनाऱ्याशेजारून जाणारा कोकण पर्यटन सागरी महामार्ग हा कोकणातील पर्यटनाच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. या महामार्गाचा डीपीआरही जवळपास पूर्ण झाला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया मेअखेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील यांनी सांगितले.

  • मुंबई-गोवा महामार्ग हा महत्त्वपूर्ण मार्ग जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या महामार्गाचे २० हजार कोटींचे विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) मंजूर केले आहेत.
  • त्यापैकी महाराष्ट्रातील मार्गासाठी ११ हजार ७४७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या महामार्गाच्या रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या झाडांचे पुनरेपण करण्यासह नवीन झाडांची लागवड आणि सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे, असे गडकरी म्हणाले.