मुंबई उपनगरात वीजपुरवठा करणाऱ्या ‘टाटा पॉवर कंपनी’च्या वीज वितरण परवान्यास २५ वर्षांची मुदतवाढ देतानाच टाटाला मुंबईच्या हद्दीपुढे जाऊन मीरा-भाईंदपर्यंत वीजपुरवठा करण्याची परवानगी ‘राज्य वीज नियामक आयोगा’ने दिली आहे. त्यामुळे, रहिवाशांना रिलायन्सबरोबरच टाटाची वीज निवडण्याचा पर्यायही खुला राहील.
वीज वितरण परवान्याची मुदत १४ ऑगस्ट, २०१५ रोजी संपत होती. त्यामुळे, या परवान्याला मुदतवाढ देण्याबद्दलचा प्रस्ताव वीज आयोगासमोर आला होता. वीज आयोगाने गुरुवारी मध्यरात्री परवान्याची मुदत संपण्यास दोन मिनिटे उरली असताना टाटा पॉवरच्या वीज परवान्याला मुदतवाढ दिली. आता हा परवाना १४ ऑगस्ट, २०३९ पर्यंत राहील.  परवान्याला मुदतवाढ देताना  वीज वितरणासाठी यंत्रणा कशा रितीने उभारणार याचा आराखडा सहा आठवडय़ात सादर करण्याचा आदेश आयोगाने दिला. ‘मुंबई ग्राहक पंचायती’ने मात्र परवान्याला मुदतवाढ देताना वीज नियामक आयोगाकडून झालेल्या विलंबाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा काय प्रकार आहे? इतका उशीर होण्याचे काय कारण? असे प्रश्न ‘मुंबई ग्राहक पंचायती’चे शिरीष देशपांडे यांनी केली.
बेस्टच्या वाहतूक विभागाला पाठबळ देणार
टाटाच्या वीजपुरवठय़ाच्या परवान्याला मुदतवाढ देण्याबाबतची सुनावणी वीज आयोगासमोर सुरू असताना ‘बेस्ट’ने हरकत घेतली होती. टाटाला मुंबई शहरात वीजपुरवठा करण्याचा परवाना मिळाला, तर बेस्टचे वीजग्राहक टाटाकडे जातील. त्यामुळे, ‘या ग्राहकांकडून बेस्टच्या परिवहन विभागाला मिळणाऱ्या अनुदानात कपात होईल आणि वाहतूक विभागाचा तोटा वाढेल. त्याचा फटका बस प्रवाशांना बसू शकेल,’ असा मुद्दा बेस्ट’ने मांडला होता. त्यावर टाटाने बेस्टचे वीज ग्राहक आमच्याकडे आले तरी आम्ही बेस्टच्या वाहतूक विभागाला आवश्यक आर्थिक पाठबळ देऊ, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे बेस्टकडून टाटाकडे स्थलांतरीत झाल्यावरही वीजग्राहकांना परिवहन विभागाच्या तोटय़ापोटी वसूल करण्यात येणारा जादा आकार द्यावा लागण्याची शक्यता आहे.