दक्षिण मुंबईतील हेरिटेज मिल असोसिएशनचा दावा

दक्षिण मुंबईत सुरू असलेल्या कुलाबा-सिप्झ या मेट्रो-३ च्या कामामुळे दादाभाई नौरोजी रस्त्यावरील (डी. एन. रोड) ऐतिहासिक वारसा दर्जाच्या इमारतींना दिवसेंदिवस धोका निर्माण होत असल्याचा दावा ‘हेरिटेज मिल असोसिएशन’ ने केला आहे. हुतात्मा चौकातून छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या डी. एन. रोड वर सध्या मेट्रो-३ साठी करण्यात येणाऱ्या  खोदकामामुळे ऐतिहासिक दर्जा असणाऱ्या इमारतींमध्ये कंपने जाणवत आहेत. यासंदर्भात मेट्रो-३ प्रशासन आणि कंत्राटदारांसोबत झालेल्या बैठकीत इमारतींच्या सुरक्षेबाबत सुचवलेल्या उपाययोजना अमलात न आणल्या गेल्याचे हेरिटेज मिलचे म्हणणे आहे.

कुलाबा ते सिप्झ या मेट्रो-३ च्या हुतात्मा चौक स्थानकासाठी डी. एन. रोडवर सध्या प्राथमिक स्तरावर खोदकामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या रस्तालगत असणाऱ्या १०० वर्ष जुन्या ब्रिटीशकालीन इमारतींमध्ये कंपने जाणवण्यास सुरुवात झाली आहे. २५ मे पासून या रस्त्यावर सुरु झालेल्या खोदकामामुळे थॉमस कुक आणि शेजारील इमारतींमध्ये कंपने जाणवण्यास सुरूवात झाल्याची माहिती हेरिटेज मिल असोसिएशन ने दिली. कामाला सुरुवात होण्याआधी एप्रिल महिन्यात हेरिटेज मिल असोसिएशनचे सदस्य, इमारतींचे मालक  आणि मेट्रो-३ चे अधिकारी आणि कंत्राटदार (एल अ‍ॅण्ड टी) यांमध्ये बठक  पार पडली होती. या बैठकीत प्रत्येक इमारतीत खोदकामादरम्यान होणाऱ्या कंपाची मोजणी करणारे यंत्र बसवण्यात येणार असल्याचे कंत्राटदारांकडून सांगण्यात आले होते. कामाला सुरुवात होऊन महिना होत आला तरी कोणत्याही प्रकारचे यंत्र इमारतींमध्ये बसवण्यात न आल्याचे हेरिटेज मिल कडून स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय कंत्राटदारांच्या काही अधिकाऱ्यांनी इमारतींना भेटी देऊन त्यांचे सर्वेक्षणही केले होते मात्र या सर्वेक्षणाचा अहवाल इमारती मालकांना अजूनही न मिळाला नसल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे येत्या काळात खोदकामाला सुरुवात झाल्यास इमारती कोसळण्याची भीतीही असोसिएशनने व्यक्त केली आहे.

इमारतींची पाहणी करणार

सध्या या परिसरात सीकेंट पायलिंगचे काम सुरू आहे. या कामामुळे होणारी कंपने ही सौम्य आहेत. याचा कोणताही गंभीर परिणाम आसपासच्या इमारतींवर होणार नसल्याचे ‘एमएमआरसी’च्या प्रवक्त्याने स्पष्ट केले. ऑक्टोबर महिन्यात सुरू होणाऱ्या बोगद्याच्या कामादरम्यान मोठय़ा प्रमाणावर कंपने जाणवतील. याचा खबरदारीचा उपाय म्हणून मेट्रोच्या मार्गात येणाऱ्या सर्व इमारतींच्या बांधकामाची व त्यांच्या सद्यस्थितीची पाहणी केली जाणार आहे. हे काम सध्या सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर इमारत कितपत धोकादायक आहे त्यानुसार त्यांचे गट केले जाणार आहेत. यात जर काही इमारती भक्कम करावयाच्या असतील किंवा इमारतींना बाहेरून टेकू लावण्याची आवश्यकता असेल तर त्याची जबाबदारी ‘एमएमआरसी’ घेणार आहे. याचबरोबर बोगद्याचे काम सुरू असताना आसपासच्या परिसरातील इमातरतींवर ‘बिल्डिंग सेटलमेंट मीटर’, ‘क्रॅक मीटर’ आदी उपकरणे बसविली जाणार आहेत. या उपकरणांच्या माध्यमातून कोणत्याही इमारतीला काही धोका निर्माण झाल्यास त्याची माहिती काम करणाऱ्या यंत्रणेला मिळणार आहे.  त्यानुसार तातडीने उपाययोजना करण्यात येतील असेही प्रवक्त्यांनी सांगितले.