आपल्याकडील उरलेल्या दोन-चार नोटा बदलून घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिक बँकांपुढे तळपत्या उन्हात, उपाशी-तापाशी रांगा लावून उभे राहात असताना, ज्यांची झोप उडावी असे काळापैसाधारक मात्र बिनघोर असल्याचे दिसत आहे. याचे कारण सर्वसामान्य नागरिकांच्या नजरेआड सुरू असलेले रंगबदलाचे जादूचे प्रयोग. ही जादू आहे काळ्याचे गुलाबी करण्याची.. बाजारात काळा पैसा विविध मार्गानी बेमालूम पांढरा करून देण्याचे काळे धंदे सुरू असून, या ‘स्कील इंडिया’मुळे मोदी सरकारचा काळ्या धनावरील ‘लक्ष्यभेद’ कितपत यशस्वी होईल असा सवाल जाणकारांकडून विचारला जात आहे. या काळ्या जादूच्या प्रयोगांचे हे काही सुरस किस्से..

धनशुद्धीचा टक्का

निवडणूक म्हणजे मतपेटीचा आणि पेढीचा खेळ. सध्या मुंबईत हवा आहे ती निवडणुकीची. त्याकरीता अनेक इच्छुकांनी पैशांची बेगमी करून ठेवलेली. पण सगळाच चलनकल्लोळ झाला आणि या नेत्यांना, नगरसेवकांना घोर लागला तो जुन्या हिरव्या बेगमीचे काय करायचे याचा. परंतु यावरही बहुसंख्य राजकारण्यांनी तोडगा काढलाच. काहींनी निवडणुकांच्या तारखा घोषित होतील तेव्हा होतील, असे म्हणत आधीच पैसेवाटपाचा कार्यक्रम हाती घेतला. यातून काही बंडले कमी झाली. उरलेल्यांसाठी रंगबदल करण्यासाठी आर्थिक क्षेत्रातील सुपरिचित दलाल होतेच. त्यांनी हजारी आठशे-नऊशेचा दर लावला. काहींनी तर पन्नास टक्क्य़ांपर्यंत मजल मारली. पण नोटा गुलाबी करून दिल्या. बिल्डर, व्यापारी यांबरोबरच राजकारण्यांनीही याद्वारे धनशुद्धी करून घेतली. पनवेलमध्ये तर वेगळीच तऱ्हा. तेथील एका नगरसेवकाने सरळ आपल्या प्रभागातील आपल्या जवळच्या नी खात्रीच्या काही लोकांना पाच-पाच, दहा-दहा हजाराची बंडले दिली. ही पांढरी, गुलाबी काय वाट्टेल ती करून घ्या. वीस-तीस टक्के तुमचे. उरलेले आम्हांस आणून द्या, असा तो सरळ हिशेब. यातून एका दगडात त्याने दोन गुलाबी पक्षी मारले. एक आपले काळे धन पांढरे केले आणि मतदारांनाही खुश केले.

पांढरी जीवनशैली

तिकडे सीमेवर जवान शहीद होत असताना ऐन दिवाळीत घरी बहुधा फराळही न करणारा, मोदींच्या चलनशुद्धीच्या निर्णयाला समाजमाध्यमांतून जीवतोड पाठींबा देणारा देशभक्त मध्यमवर्ग, उच्चमध्यमवर्ग मात्र अशा रंगबदल जादूपासून दूरच होता. त्यांनी काळ्याचे पांढरे करण्याचा वाममार्ग पत्करला नाही. त्यांनी काळ्याचे पांढरे करण्याचा उजवा मार्ग पत्करला. त्यातील अनेकांनी सरळ मागील तारखेने मोटारसायकल, आयफोनसारखे महागडे फोन खरेदी करून टाकले. स्पोर्ट्स क्लब, स्पा, जिम, ब्युटीपार्लरची मेंबरशीप, हॉलिडे पॅकेज, डे केअर सेंटर अशा ठिकाणची पुढील दहा-पंधरा महिन्यांची मेंबरशीप देण्याच्या नावाखालीही जुन्या नोटा स्वीकारल्या जात आहेत.

गुलाबीतून काळ्याचे पांढरे

पाचशे, हजाराच्या नोटा बदलण्याचा एक मार्ग जसा बँकेतील काऊंटरबाहेरून जातो, तसाच तो काऊंटरच्या आतूनही जात असल्याची चर्चा आहे. बँकेतील एका अधिकाऱ्यानेच एका व्यावसायिकाला ही चोरवाट दाखविली. त्याने सांगितले, की कितीही नोटा (म्हणजे अर्थातच हिरव्या काळ्या नोटा!) आणा. आम्ही त्या गुलाबी करून देऊ. आता हे करणार कसे? तर सोपे आहे. बँकेत त्या पाचशेच्या नोटा ठेऊन घेणार. आज नोटा घेण्यासाठी रांगा लावणारे लोक आणखी काही दिवसांत नोटा भरण्यासाठी येतीलच. आम्ही त्या जमा करून घेणार. पण नोंद करणार त्यांनी पाचशेच्या नोटा दिल्याची. म्हणजे त्याने दोन हजार रूपयांची नोट भरली, तर आम्ही दाखविणार त्याने पाचशेच्या चार नोटा दिल्याचे. त्याची सहीही घेणार त्या कागदावर आणि तुमच्या पाचशेच्या चार नोटा त्यात जिरवणार. त्या बदल्यात तुम्हांला मिळणार कोरी करकरीत गुलाबी नोट. अशा प्रकारे तुमचे लाखो काळे रूपये  गुलाबी करून मिळतील.. ही रंगीन जादू किती ठिकाणी सुरू आहे याची माहिती मात्र त्याने दिली नाही. बहुधा ती माहिती गोपनीय असावी.. सामान्य लोकांसाठी!

उलटी गंगा..

गृहनिर्माण क्षेत्र म्हणजे काळे धन निर्मितीचा कारखानाच. या क्षेत्राशी संबंधित असलेल्या काही सरकारी अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरील रंग गेल्या काही दिवसांत गुलाबी नोटांप्रमाणेच उडू लागला आहे. खासकरून ज्यांच्याकडे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आधीच पेटय़ा पोचत्या झाल्या आहेत, त्यांचे. या पेटय़ांतील जुन्या नोटांचे आता करायचे काय? त्यातील काही मात्र भलतेच पोचलेले. त्यांपैकी एकाने – हा वांद्रयात कार्यालय असलेल्या गृहविभागाशी संबंधित अधिकारी – त्याने सरळ त्या बांधकाम व्यावसायिकालाच गाठले. ‘तू पाठविलेले पैसे पोचले. पण ते आता बदलून दे. मी पेटी परत पाठवतोय.’ बांधकाम व्यावसायिकांकडून अधिकाऱ्यांकडे वाहणारी पैशाची गंगा अशा रितीने उलटी वाहू लागली. आता हा काळा पैसा गुलाबी रंगात रंगवून देण्याशिवाय त्या व्यावसायिकाकडे अन्य पर्यायही नाही. या सगळ्यात होणार काय, तर हिरवे काळे धन गुलाबी काळे धन होण्याची जादू!

पोलिसांतील दैववादी..

पाचशे व हजारच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाने काही पोलीस अधिकाऱ्यांचे धाबेच दणाणले. ते अर्थातच बँकांपुढील रांगांसाठी बंदोबस्त ठेवण्याचे अतिरिक्त काम मागे लागेल म्हणून नव्हे. मोठय़ा हिमतीने, अक्कलहुशारीने जमा केलेली माया क्षणात नाश पावणार या कल्पनेने ते सैरभैर झाले. यात काही चकमकफेम अधिकाऱ्यांचाही समावेश होता. त्यातील काहींनी तातडीने धाव घेतली ती मर्जीतील विकासकांकडे. पण हे विकासकही आधीच अडचणीत आलेले. त्यांनीही हात वर केले. आमच्याकडे ठेवण्यासाठी दिलेले पैसे घेऊन जा, असा सल्ला ऐकल्यावर ते हादरूनच गेले. मग कोणी गावी जाऊन जमिनी खरेदी करण्याचा सल्ला दिला. काहींनी गावी जाऊन जमिनी विकत घेण्याचाही प्रयत्नही केला. परंतु जमिनीच्या व्यवहारापोटी लाखो रुपयांची बयाणाही यापैकी अनेकांनी देऊन टाकल्याचे कळते. काहींनी बँकांतील ओळखीच्या अधिकाऱ्यांना गाठले. त्यातील काही दैववादी. त्यांनी होते कधी कधी व्यवसायात नुकसान, असे म्हणत गप्प बसण्याची भूमिका घेतली. काही जरा अधिक देववादी. त्यांनी गावच्या मंदिरांना मोठय़ा देणग्या दिल्या. अनेकांनी शिर्डीच्या साईबाबांच्या चरणीही आपली चलननिष्ठा वाहिली. अजूनही त्यातील अनेक अधिकारी गुलाबी स्वप्ने रंगवत आहेत.. ती अर्थातच वास्तवात उतरतील.

लॉकरमध्ये दडलंय काय?

ठाण्यातील लुईसवाडी. भाग निम्नमध्यमवर्गीय. अन्य बँकांप्रमाणेच तेथेही ८ तारखेनंतर मोठय़ा रांगा लागल्या. पण त्यांत एक वेगळेपणा होता. त्यातील एक रांग होती लॉकर विभागासाठीची. सणासुदीचा हंगाम सोडला तर बँकांतील लॉकर विभाग तसा ओसच पडलेला असतो. मग आताच तेथे रांगा का लागत आहेत, असा प्रश्न बँकेच्या व्यवस्थापकांनाही पडला होता. त्यांनी सांगितले,  येथे एरवी दिवसाला लॉकरसाठी पाच ते दहा खातेदारांची नोंद होत असते. गेल्या पाच दिवसांमध्ये मात्र हे प्रमाण सरासरी ७० ते ८०च्या घरात पोचले आहे. याचे नेमके कारण काय असावे हे त्यांनाही कोडे होते. बँकेत कुजबूज मात्र हीच होती, की काही लोकांनी लॉकरमध्ये चक्क पैसे ठेवले आहेत आणि आता नोटा काढून घेण्यासाठी धावपळ सुरू आहे. हाच अनुभव अन्य सहकारी बँकांचाही आहे. सामान्य नागरिक, व्यावसायिक यांच्याकडील हा काळा पैसा आता पांढरा होण्याकडे वाटचाल करीत आहे. त्यासाठी नातेवाईक, नोकर, व्यवसायातील कर्मचारी यांची अर्थपूर्ण मदत घेतली जात आहे.