मुलुंड येथील शंकर टेकडी परिसरातील एका घरावर भिंतीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत एक जण ठार तर तीन जण जखमी झाले. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. दुर्घटनेत प्रशांत जाधव (१७) या युवकाचा मृत्यू झाला.

शंकर टेकडी हा भाग दुर्गम असून मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या या परिसरातून जातात. जलवाहिन्यांच्या संरक्षणाकरिता बांधण्यात आलेल्या भिंतीचा काही भाग जाधव आणि अन्य काही घरांवर कोसळला. या घटनेत जाधव यांच्या घरासह अन्य तीन घरे जमीनदोस्त झाली असून अन्य चार झोपडय़ा धोकादायक अवस्थेत आहेत.

या जलवाहिन्यांच्या संरक्षक भिंतीलगत मोठय़ा प्रमाणात घरे व झोपडय़ा बांधण्यात आल्या आहेत. या भिंतीला अनेक ठिकाणी तडे गेले असल्याचे स्थानिक रहिवाशांकडून सांगण्यात आले. हे सर्व रहिवासी येथे धोकादायक अवस्थेत राहात आहेत.

दरम्यान ही दुर्घटना घडल्यानंतर जलवाहिन्यांच्या संरक्षक भिंतीच्या पाहणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. शनिवारी संरक्षक भिंतीचे सर्वेक्षण करण्यात आले असल्याची माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने वनक्षेत्रपाल बर्गे यांनी दिली.

या दूर्घटनेनंतर अमर नगर परिसरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतची संरक्षक िभत कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी येथील तीन झोपडीधारकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.

 

तलावाची संरक्षक भिंत कोसळली

कल्याण : कल्याण शहराच्या पारनाका भागातील ऐतिहासिक पोखरण तलावाची संरक्षक भिंत शनिवारी पहाटे मुसळधार पावसाच्या तडाख्याने कोसळली. पोखरणीच्या बाजूला असलेल्या अन्नपूर्णा प्रासाद या इमारतीला भिंत कोसळल्याने धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या इमारतीमधील २४ कुटुंबांना अन्यत्र हलविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला.

शनिवारी पहाटे मुसळधार पाऊस, तुफान वारा सुरू असताना पोखरण तलावाची एक बाजूची संरक्षक भिंत कोसळली. तुफान पावसामुळे भिंत कोसळल्याचा आवाज कोणाला आला नाही. सकाळी देवदर्शनासाठी भाविक तलावाच्या काठावरील मंदिरात येताच, त्यांना भिंत कोसळल्याचे आढळून आले. पोखरणीच्या सभोवती निवासी वस्ती आहे. भिंत कोसळल्याने सभोवतालच्या इमारतीना काही धोका आहे का म्हणून तातडीने ही माहिती पालिका प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे, स्ट्रक्चरल इंजिनीअर नयन ढोलकिया यांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यावेळी अन्नपूर्णा प्रासाद या इमारतीला धोका असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने या इमारतीमधील रहिवाशांना स्थलांतरित होण्यास सांगितले. भविष्यात आजूबाजूच्या इमारतींनाही धोका उद्भवणार असल्याचे अधिकाऱ्यांनी पाहणीअंती स्पष्ट केले.