‘खबरी’ हे पोलिसांचे कान व डोळे असून त्यांना पोसण्यासाठी आवश्यक असलेले उत्पन्न कमी झाल्याचा फटका खबरी पोलिसांपासून दुरावण्यात झाला आहे. एकीकडे गेल्या काही वर्षांत खबऱ्यांचे स्वरुपही पुरते बदलले आहे. संघटित गुन्हेगारीचा कणा पार मोडलेला असतानाही या बाबतची ‘खबर’ देण्यासाठी आजही रग्गड बिदागी दिली जात आहे. एक खबर किमान दोन हजार ते कमाल दोन लाख रुपये इतकी असते. पोलिसांकडे असलेला गोपनीय निधीही मोठय़ा प्रमाणात उपलब्ध करून दिला जात असला तरी चांगल्या खबरींची वानवा असल्याची खंत पोलीस अधिकारी बोलून दाखवितात.
एका वरिष्ठ पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, पूर्वी पोलिसांना खबर पुरविणे, हा काही खबऱ्यांचा धंदा होता. खबऱ्यांचे स्वत:चे जाळे होते. परंतु मुख्य खबऱ्याशिवाय त्याचे पंटर्स पोलिसांपर्यंत पोहोचू शकत नसत. पोलिसांचे उत्पन्न कमी झाल्याबरोबरच खबरीही आपसूकच कमी झाले आहेत. पोलिसांचे अर्धे काम खबऱ्यांमुळेच होत असते. संघटित गुन्हेगारी टोळ्यांतील कोण म्होरके तुरुंगात आहेत वा कोण सुटले आहेत, ते कोठे जातात वा काय करतात, याबाबतची माहिती खबऱ्यांकडूनच पोलिसांना मिळत असते. काही वेळा ही माहिती एका मोठय़ा गुन्ह्य़ाची उकल करून देतात, तेव्हा खबऱ्यांची किंमत वाढते, अशी माहितीही एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.
संघटित गुन्हेगारी टोळ्यांचे अनेक म्होरके हे बिल्डरांचे हस्तक झाले आहेत. भूखंडाचे संरक्षण करणे वा भाडेकरूंना धमकावण्याचे कामही या म्होरक्यांकडून केले जाते. अशा वेळी या म्होरक्यांची माहिती देण्याचे कामही खबऱ्यांकडूनच होते. डान्स बार, मटका वा दारुचे अड्डे बंद झाल्यामुळे पोलिसांचे ‘उत्पन्न’ कमी झाले, हे खरे असले तरी एखाद्या गुन्ह्य़ाची उकल झाली तरी स्वत:हून बिदागी देणारे अनेक आहेत. त्यातूनही खबरी पाळता येतो. मात्र सध्या खबरीच कमी झाल्याची खंत काही पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. सध्या एका खबरीचा दर किमान मोबाइल फोन आणि दोन हजार रुपये ते कधी कधी दोन लाखांपर्यंतही जातो, अशी माहितीही सूत्रांनी दिली़

प्राधान्यक्रम कसा ठरतो?
मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्य काम हे संघटित गुन्हेगारीला आळा घालणे हे आहे. त्यामुळे संघटित गुन्हेगारी टोळ्यांबाबतची माहिती देणारी ‘खबर’ ही नेहमीच पहिल्या क्रमांकावर राहिली आहे. पोलीस ठाण्याच्या पातळीवर खुनासारख्या गंभीर गुन्ह्य़ाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविला जातो. खबऱ्यांच्या मदतीच्या सहाय्याने गुन्हे अन्वेषण विभागाने अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्य़ांची उकल केली आहे. त्यापाठोपाठ दरोडा वा जबरी चोऱ्या करणाऱ्या आरोपींची माहिती देणाऱ्या खबऱ्याला मान मिळतो. अमली पदार्थ वा बनावट चलनी नोटांच्या तस्करीबाबतची खबर वज्र्य नाही. मात्र या दोन्ही गुन्ह्य़ांसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असल्यामुळे या खबऱ्यांना जास्त मलिदा दिला जात नाही, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

‘खबरी’चा प्राधान्यक्रम
१ संघटित गुन्हेगार- टोळी
२ खुनासारख्या गंभीर गुन्ह्य़ातील आरोपीची माहिती
३ दरोडा, जबरी चोरी
४ अमली पदार्थाची तस्करी
५ बनावट चलनी नोटांची तस्करी

खबर आणि खबरी याशिवाय पोलिसांचे कामच होऊ शकत नाही. चांगल्या खबरीला आजही किंमत आहे. पूर्वीसारखे गुणवान खबरी कमी झाले आहेत. पोलिसांच्या उत्पन्नाचा आणि खबरीचा तसा संबंध नाही. मी गुन्हे अन्वेषण विभागात असताना चांगल्या खबऱ्यांसाठी गोपनीय निधी उपलब्ध करून दिला आहे.
– हिमांशू रॉय, अतिरिक्त महासंचालक, राज्य दहशतवादविरोधी पथक.