जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आपणच असल्याचे जाहीरपणे सांगणाऱ्या माहिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी चक्क मुख्यमंत्र्यांच्याच खुर्चीवरून जलयुक्त शिवार योजनेचा आढावा घेतल्याने या बैठकीस उपस्थित अधिकाऱ्यांच्याही भुवया उंचावल्या.
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणेच पंकजा मुंडे यांचीही राज्याचे मुख्यमंत्री होण्याची इच्छा कधीच लपून राहिलेली नाही. त्यामुळेच गेल्या वर्षी पुण्यात झालेल्या भारती विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात त्यांनी आपली ही सुप्त इच्छा बोलून दाखवताना, मला प्रत्यक्षात मुख्यमंत्री होता आले नसले तरी राज्यातील जनतेच्या मनात मुख्यमंत्री म्हणून मीच आहे, असे धाडसी वक्तव्य केले होते. भाजपतील जातीपातीच्या पक्षीय राजकारणामुळे मुख्यमंत्रिपदाचे मुंडे यांचे स्वप्न तूर्तास भंगले असले तरी ‘इच्छा तेथे मार्ग’ या उक्तीचे प्रत्यंतर आणून देत मुंडे यांनी आपल्या आसनामागे मुख्यमंत्रिपदाची उपाधी लावून तेही साध्य करून दाखविले.
त्याचे असे झाले, सध्या राज्यात गाजत असलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी ग्रामविकासमंत्री मुंडे यांनी राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक बोलाविली होती. या बैठकीस रोहयो आणि जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख यांच्यासह जिल्हय़ांमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुंडे यांची ही बैठक मंत्रालयात समिती कक्षात पार पडली. त्या वेळी मुंडे ज्या खुर्चीत बसल्या त्यामागे ‘मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन’ असा फलक होता. मुंडे यांनी कळत न कळत केलेली ही कृती पाहून बैठकीस उपस्थित अधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. मात्र मंत्रिमहोदयांना त्याची जाणीव करून देण्याची हिम्मत कोणालाही झाली नाही.