मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात वैमानिकाला दिसलेल्या पाच पॅराशूटच्या रहस्याचा मंगळवारी अखेर पर्दाफाश झाला. ते पॅराशूट नसून फुगे असल्याचे निष्पन्न झाले. एका क्रिकेट स्पर्धेसाठी हे फुगे आकाशात सोडण्यात आले होते.
विमानतळ पोलिसांनी याप्रकरणी या स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या इव्हेंट मॅनेजमेंटच्या कंपनीच्या कुणाल शहा आणि नीलेश श्रीमाणकर या दोघांना अटक केली. मंगळवारी या दोघांना अंधेरी येथील स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची दहा हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर सुटका केली.
शनिवारी संध्याकाळी मुंबईहून अहमदाबादला जाणाऱ्या जेट एअरवेजच्या वैमानिकाला आकाशात पाच पॅराशूटसदृश वस्तू तरंगताना दिसल्या. त्या अचानक गायब झाल्या. त्यामुळे त्याने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला माहिती देऊन उड्डाण थांबवले होते. या गूढ पॅराशूटमुळे सुरक्षा यंत्रणेत मोठी खळबळ उडाली होती. पंतप्रधान कार्यालयानेही त्याची दखल घेत केंद्रीय सुरक्षा समित्यांना चौकशीचे आदेश दिले होते. मुंबई पोलिसांच्या आठ विशेष पथकांबरोबरच हवाई दल, रॉ, आयबी, केंद्रीय गुप्तचर विभाग, नौदल, दहशतवादविरोधी पथक आदींसह सात केंद्रीय समित्या याचा तपास करत होत्या. दरम्यान, विमानतळ पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता याचे गूढ उकलले. सांताक्रुझच्या कलिना भागातील गेट क्रमांक ८ येथे एका धर्मानंद डायमंड एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीतर्फे शनिवार आणि रविवारी क्रिकेटचे सामने भरवले होते. त्या सामन्यात उद्घाटनसमयी संघांची नावे असलेले एअर बलून (फुगे) आकाशात सोडण्यात आले. त्यातील पाच फुगे विमानतळ परिसरात गेले. जेट एअरवेजच्या वैमानिकाला लांबून हे फुगे म्हणजे मानवविरहित पॅराशूट असल्याचा समज झाला आणि पुढचा गोंधळ उडाला.