दहीहंडी उत्सवात सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे.

दहीहंडीची उंची २० फूट असावी आणि थरामध्ये १८ वर्षांखालील मुलांचा सहभाग नसावा, असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले होते. हायकोर्टाने घातलेले निर्बंध सुप्रीम कोर्टानेही कायम केले होते. मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. दहीहंडी हा पिढ्यानपिढ्या चालणारा मराठी सण असून या सगळ्या गोष्टी तोडण्याचा कट आखला जात आहे असा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. यानंतर दहीहंडीला मुंबई – ठाण्यात मनसे नेत्यांनी २० फुटांपेक्षा जास्त उंचीवर दहीहंडी लावून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे  उल्लंघन केले होते. तर गोविदा पंथकांनीही २० फुटांपेक्षा जास्त उंचीचे थर रचून कोर्टाचे आदेश धाब्यावर बसवले होते.

दहीहंडीत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठाण्यात पोलिसांनी आयोजक आणि मंडळांवर गुन्हा दाखल केला होता.  याप्रकरणी तब्बल १९ गुन्हे दाखल झाले होते.  दुसरीकडे राज ठाकरे यांच्याविरोधात स्वाती पाटील यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. २० सप्टेंबर रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.  या याचिकेमुळे राज ठाकरे यांच्या अडचणीत भर पडली आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी रविवारीच पत्रकार परिषदेत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन  झाले नाही असे म्हटले होते. सुप्रीम कोर्टाने २० फुटांपेक्षा जास्त उंचीवर दहीहंडी फोडण्यास मनाई केली होती. मात्र जर दहीहंडी फोडलीच नसेल तर तो गुन्हा कसा ठरेल असा पवित्रा राज ठाकरे यांनी घेतला होता.