पश्चिम रेल्वेच्या डहाणू ते चर्चगेट स्थानकांदरम्यान महिलांसाठी विशेष लोकल सुरू करण्यात यावी यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली आहे. त्यावर गुरुवार, २१ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकल गाडय़ांचा विस्तार डहाणूपर्यंत करण्यात आला आहे. २०१३ पासून चर्चगेट-डहाणू लोकल सुरू करण्यात आली. मात्र महिलांसाठी या मार्गावर एकही लोकल नाही. त्यामुळे महिला प्रवाशांचे मोठे हाल होतात. डहाणू, वाणगाव, बोईसर, उमरोळी, पालघर, केळवे, सफाळे, वैतरणा या भागांतून अनेक महिला मुंबईत कामासाठी येतात. कष्टकरी महिलांसह मंत्रालय, भारतीय आयुर्विमा महामंडळ, शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, वांद्रे-कुर्ला संकुल येथे नोकरीनिमित्त महिला येत असतात.

प्रवाशांची वाढती संख्या, अपुऱ्या लोकल फेऱ्या आणि वाढती गर्दी यामुळे महिलांना प्रवास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. महिला कामगारांसह, विद्यार्थिनींनाही गर्दीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेच्या कारणास्तव सकाळी ७.३० वाजता डहाणू ते चर्चगेट अशी महिला विशेष लोकल सुरू करावी, अशी मागणी गेले कित्येक महिने करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून राजकुमार चोरघे यांनी अ‍ॅड्. इंद्रजीत कुलकर्णी यांच्यामार्फत एक जनहित याचिका करून डहाणू ते चर्चगेट अशी महिला विशेष लोकल सुरू करण्याची मागणी केली आहे.

मुख्य न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या याचिकेवर २१ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.