२३८ किलो एमडी हस्तगत; नेपाळपर्यंत धागेदोरे

‘एमडी’ हा अंमलीपदार्थ तयार करून त्याची विक्री आफ्रिका, नेपाळमधील तस्करांना करणारी टोळी महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागाने उद्ध्वस्त केली. ‘डीआरआय’ने या टोळीचा पालघर येथील कारखानाही उद्ध्वस्त केला. २३८ किलो कच्च्या स्वरूपातील ‘एमडी’, हे तयार करण्यासाठी आवश्यक असलेले ग्लास लायनर रिअ‍ॅक्टर व अन्य सामग्रीही जप्त करण्यात आली.

भानुदास मोरे ऊर्फ भावेश पटेल हा या टोळीचा म्होरक्या असून त्याच्या विरार येथील भाडय़ाच्या घरातून आठ किलो हशीश आणि टोळीच्या मुळापर्यंत जातील अशी महत्त्वाची कागदपत्रे सापडली आहेत. त्यात एका रोजनिशीचाही समावेश असून यात महत्त्वाच्या नोंदीही आढळून आल्या आहेत. जप्त करण्यात आलेला ‘एमडी’चा हा साठा येत्या काही दिवसात नेपाळला प्रति किलो सव्वा लाख रुपये किमतीने विकण्यात येणार होता. डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार मोरेला या आधी केंद्रीय अंमलीपदार्थविरोधी पथकाने २००१मध्ये तस्करीप्रकरणी अटक केली होती. त्यात त्याला कारावासाची शिक्षाही झाली. २००७पर्यंत तो कारागृहात बंद होता.

दरम्यान महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मालाड येथून एमडी तस्करांना अटक केली होती. भाडय़ाच्या खोलीत एमडी तयार करण्याचा धंदा एटीएसने उद्ध्वस्त केला होता. त्या गुन्हय़ात मोरे फरारी आरोपी आहे. या तस्करांना अ‍ॅसीटोन हे रसायन व अन्य कच्चा माल पुरवल्याचा आरोप मोरेवर आहे. मोरेसह रौफ लुलानीया, वझहूल चौधरी, मनीष रावल या तिघांना बेडय़ा ठोकल्या आहेत. यापैकी वझहूल ऊर्फ पप्पू याने मोरेला हा कारखाना उभा करण्यात सर्वतोपरी साहाय्य केले. तसेच मोरेने तयार केलेला एमडीचा साठा तो विकत घेऊन नेपाळला त्याची विक्री करत असे. चौकशीदरम्यान उत्तर प्रदेश आणि नेपाळ सीमेवर तस्करी करण्यात पप्पू सराईत असल्याची बाब समोर आली आहे. डीआरआयने हस्तगत केलेला २३८ किलो एमडीचा साठा मोरे काही दिवसात पप्पूकडे नेपाळला नेण्यासाठी देणार होता.

मोरेच्या कारखान्यासाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री रौफने महापेतील एका मकवाना नावाच्या व्यक्तीकडून विकत घेतली होती. कारखान्यातील सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्याची मुख्य जबाबदारी रौफ व मनीषवर होती. चौकशीदरम्यान, या टोळीने तयार केलेले १८ किलो एमडी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात दोन आफ्रिकन तरुणांनी विकत घेतल्याची बाब समोर आली. या टोळीला मंगळवारी अटक करण्यात आली.