तिघांविरोधात गुन्हा दाखल
बनावट वकिलांची टोळी असल्याच्या आरोपावरून आझाद मैदान पोलिसांनी एक वकील आणि त्याच्या दोन महिला सहकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वकिलाविरोधात बोरिवली, कुरार पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, तक्रारदाराविरोधात माझ्या सहकारी महिलेने लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केल्यानेच तक्रार करण्यात आल्याचे आरोपी वकिलाचे म्हणणे आहे.
वकील सुनील कुमार यांची कुमार अँड असोसिएट्स ही विधि कंपनी आहे. कुमार यांच्याबरोबर दोन महिला कर्मचारी काम करत असून शशिकांत चौधरी यांनी या दोन्ही महिला वकील नसूनही त्या वकील असल्याचे भासवत आहेत, अशी तक्रार अनेक पोलीस ठाण्यांमध्ये केली आहे. माझ्या माहितीप्रमाणे सुनील कुमार हे अधिकृतरीत्या वकील आहे, पण त्यांच्या दोन सहकारी वकील नसूनही रोझनामा, जामिनपत्र यांच्यावर त्यांच्या नावाचे शिक्के, सही आहेत. केवळ नागरिकांचेच नाही तर न्यायालयाचीही दिशाभूल होत असून हे एक प्रकारे फसवणूक असून त्यात अनेक व्यक्ती सहभागी असण्याची शक्यता तक्रारदार चौधरी यांनी व्यक्त केली. त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार, आझाद मैदान पोलीस ठाण्यात ८ एप्रिलला सुनील कुमार आणि त्यांच्या दोन्ही महिला सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सुनील कुमार यांनी या तक्रारींचे खंडन केले. तक्रारदार चौधरी माझ्याकडेच कामाला होते, परंतु माझ्या महिला सहकाऱ्याचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार त्याच्याविरोधात आहे. त्यानंतर मी त्यांना कामावर काढून टाकल्यानेच खोटय़ा तक्रारी करण्यात आल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले.