खोदकाम टाळण्यासाठी कामे चार महिने लांबणीवर; पावसाळ्यात पाणी साचण्याची चिन्हे

पावसाळा सुरू झाल्यानंतर मुंबईतील कोणत्याही रस्त्यावर खोदकाम राहू नये यासाठी महापालिका आयुक्तांनी काटेकोरपणे खोदकामाची डेडलाइन पाळण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे येत्या पावसाळ्यात मुंबईतील रस्ते खोदलेले दिसणार नसले तरी आयुक्तांच्या या आदेशामुळे पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती आवश्यक असलेल्या ७७६ रस्त्यांची कामे आता चार महिने लांबणीवर पडली आहेत. या रस्त्यांची आधीच दुर्दशा झाली असून पावसाळ्यात त्यांची अवस्था अतिशय बिकट होण्याची चिन्हे आहेत. या रस्त्यांवर खड्डे पडू न देण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांवर सोपवण्यात आली असली तरी या रस्त्यांवर पाणी साचल्याने त्रास मुंबईकरांनाच होणार आहे.

दर वर्षी पालिकेतील खर्चाचा सर्वाधिक भाग रस्त्यांसाठी खर्च होतो. साधारण दोन ते अडीच हजार कोटी रुपये रस्ते, पूलदुरुस्ती, रस्त्यांचे नवीन बांधकाम यासाठी राखून ठेवले जातात. त्यातच पुढील वर्ष निवडणुकांचे असल्याने रस्त्यांच्या कामांची संख्या या वर्षी वाढली आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०१५ मध्ये पालिकेने शहरातील ५३१ रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली होती तर यावर्षी तब्बल १०१७ कामांना मंजुरी मिळाली. एप्रिलमध्ये यातील ३७६ कामे सुरू करण्यात आली तर उर्वरित ६४१ कामे ऑक्टोबरनंतरच सुरू होणार आहेत. अर्थात एप्रिलमध्ये सुरू झालेल्या ३७६ कामांपैकीही १३५ रस्त्यांवरील कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही. ही कामे पावसाळ्याआधी संपण्याची शक्यता नसल्याने या कामांनाही ऑक्टोबरनंतरच मुहूर्त मिळेल. उर्वरित काम हाती घेतलेल्या २४१ रस्त्यांपैकी १५८ रस्त्यांची कामे आजमितीला पूर्ण झाल्याचा दावा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला. केवळ ८३ रस्त्यांवर काम सुरू असून ती मान्सूनआधी पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पावसाची शक्यता वाटल्यास दुरुस्ती थांबवून रस्ते वाहतुकीसाठी योग्य ठेवले जातील. या रस्त्यांखेरीज इतर रस्त्यांची देखभाल दुरुस्ती संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांकडे असून त्यांनी पावसाळ्यापूर्वी असे रस्ते दुरुस्त करून घेणे आवश्यक आहे, असे रस्ते विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. कोणत्याही रस्त्यांवर ३१ मेनंतर कोणतेही खोदकाम करू नये व रस्ते वाहतुकीसाठी योग्य स्थितीत ठेवण्यात यावेत असे स्पष्ट आदेश आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत.

आयुक्तांनी दिलेल्या आदेशामुळे पावसात रस्त्यांवर खोदकाम दिसणार नसले तरी दुरुस्ती व नवीन बांधकाम आवश्यक असलेल्या व पालिकेनेच मंजुरी दिलेल्या तब्बल ७७६ रस्त्यांची अवस्था मात्र केविलवाणी होण्याची शक्यता आहे. या रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली असल्याने पावसाळ्यातील जबाबदारीही संबंधित कंत्राटदारांवरच राहणार आहे. मात्र रस्त्यावर पडणारे खड्डे व उंचसखल होत असलेल्या रस्त्यांचा त्रास मुंबईकरांनाच सहन करावा लागणार आहे.

शहरातील रस्त्यांची सद्य:स्थिती

  • १०१७ रस्त्यांच्या कामांना मंजुरी
  • एप्रिलमध्ये ३७६ रस्त्यांच्या कामांची वर्क ऑर्डर
  • त्यातील १५८ रस्त्यांचे काम पूर्ण
  • ८३ रस्त्यांवर काम सुरू.
  • ७७६ रस्त्यांची दुरुस्ती, बांधकामे ऑक्टोबरनंतर.

आवाहन

पावसाळय़ात तुमच्या विभागात जमणारे पाणी किंवा रस्त्यावरील खड्डे तसेच उद्भवणाऱ्या इतर स्थानिक समस्यांना वाचा फोडण्यासाठी ‘लोकसत्ता मुंबई’ व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. यासाठी तुमच्या विभागातील समस्यांचे छायाचित्र आणि सविस्तर तपशील  mumbailoksatta@gmail.com या ईमेलवर पाठवा.