महिलांच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात तीन तृतीयपंथीयांचा धुमाकूळ
आपल्या रेल्वे अर्थसंकल्पाच्या भाषणात प्रवासी आणि खासकरून महिला सुरक्षेला प्राधान्य देण्याची भाषा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली असली, तरी प्रत्यक्षात मात्र महिला सुरक्षेची ऐशीतैशी उडाल्याचे चित्र आहे. शुक्रवारी महिलांच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात घुसलेल्या तृतीयपंथीयांनी धुमाकूळ घातल्यानंतर घाबरलेल्या महिलांनी या प्रकरणाची माहिती रेल्वे सुरक्षा दलाच्या अखिल भारतीय हेल्पलाइन क्रमांकावर दिली खरी, मात्र सुरक्षा यंत्रणेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या धिम्या लोकलच्या महिलांच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात शुक्रवारी दुपारी जोगेश्वरी स्थानकात तीन तृतीयपंथी चढले. नशेत असणाऱ्या या तिघांची आपसात भांडणे सुरू झाली.
या डब्यात आधीपासून बसलेल्या महिलांची त्यामुळे चांगलीच तारांबळ उडाली. यापैकी एका महिलेने रेल्वेच्या १८२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून याबद्दलची माहिती दिली. तसेच लोहमार्ग पोलिसांच्या ९८३३३३११११ या हेल्पलाइन क्रमांकावरही संपर्क साधला. मात्र वांद्रे स्थानक येईपर्यंत कोणीही डब्याकडे फिरकले नाही. अखेर वांद्रे स्थानकात डब्यातील महिलांनीच एकत्र येत या तृतीयपंथीयांना डब्यातून हुसकावून लावले. विशेष म्हणजे त्यानंतर गाडी चर्चगेटला पोहोचेपर्यंत पोलिसांची मदत त्यांच्यापर्यंत पोहोचली नव्हती. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल किती जागरूक आहेत, याची चुणूक मिळाल्याची प्रतिक्रिया महिला प्रवाशांनी दिली.

 

लोकलमध्ये महिलेची प्रसूती
मुंबई : ‘घबराओ नहीं बेटी, सब ठीक हो जाएगा..’ कोणत्याही हिंदी चित्रपटात शोभणारे हे वाक्य शनिवारी सकाळी भांडुप स्थानकात मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या गाडीत वारंवार ऐकवले जात होते. प्रसूतीसाठी दिव्याहून जे. जे. रुग्णालयात निघालेल्या एका महिलेला धावत्या लोकलमध्येच प्रसववेदना सुरू झाल्या. अखेर महिलांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या एका महिला डॉक्टरच्या मदतीने या महिलेची प्रसूती सुखरूप पार पडली. त्यानंतर या महिलेला भांडुप येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दिवा पूर्व येथे राहणाऱ्या सरस्वती सिंग (३०) या शनिवारी सकाळी जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी जाण्यास सीएसटीकडे जाणाऱ्या लोकलच्या अपंग व गर्भवती महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यात चढल्या. ही गाडी सकाळी १०.१०च्या सुमारास मुलुंडच्या पुढे आल्यावर त्यांना अचानक प्रसववेदना सुरू झाल्या. गाडी भांडुप स्थानकात येईपर्यंत प्रवाशांनी डब्यातील साखळी खेचून गाडी थांबवली.
रेल्वे पोलिसांनी या डब्याकडे धाव घेताच त्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले. त्यांनी तातडीने महिलांच्या डब्यात कोणी डॉक्टर आहे का, याबाबत चौकशी सुरू केली.
अखेर या डब्यातील डॉ. करुणा अहिरे यांनी पुढे येत सरस्वती सिंग यांची सुखरूप प्रसूती केली. प्रसूतीनंतर सरस्वती सिंग यांच्यासह नवजात मुलाला भांडुप येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आले.