मलिष्काला ‘डेंग्युच्या अळय़ा’प्रकरणी नोटीस; बेकायदा बांधकामाबाबतही कारवाईचे संकेत

‘मुंबई, तुला बीएमसीवर भरवसा नाय काय’ असे विडंबनगीत सादर करून मुंबईतील रस्त्यांची अवस्था मांडण्याचा रेडिओ जॉकी मलिष्का हिचा प्रयत्न मुंबई महापालिका आणि तेथील सत्ताधाऱ्यांना चांगलाच झोंबलेला दिसत आहे. समाजमाध्यमांत लोकप्रिय ठरत असलेल्या मलिष्काच्या गाण्यातील ‘तक्रारी’ दूर करण्याचे प्रयत्न करण्याऐवजी पालिकेने मलिष्कावरच ‘सूड’ उगवण्याचे ठरवल्याचे संकेत देणाऱ्या घडामोडी सध्या सुरू आहेत. एकीकडे, मलिष्काच्या आईच्या घरात डेंग्युच्या डासांच्या अळय़ा सापडल्याचा गहजब करण्यात येत असतानाच, मलिष्काच्या घरातील अनधिकृत बांधकामांप्रकरणी नोटीस पाठवण्यात येणार असल्याचे सभागृह नेत्यांनी जाहीर केले.

वांद्रेमध्ये पालीनाका येथील सनराइज इमारतीत राहत असलेल्या लिली मेंडोसा यांच्या घरी मंगळवारी, १८ जुलै रोजी गेलेल्या पालिकेच्या किटकनाशक विभागातील कर्मचाऱ्यांना तीन ठिकाणी डेंग्यू डासांच्या अळ्या सापडल्या व त्यांना त्याबद्दल नोटीस बजावण्यात आली. पालिकेच्या किटकनाशक विभागाकडून करण्यात येत असलेल्या कारवाईत जानेवारीपासून १५ जुलैपर्यंत ७,५८६ ठिकाणी डेंग्यू पसरवणाऱ्या डासांच्या अळ्या तर २,६७४ ठिकाणी मलेरिया पसरवणाऱ्या डासांच्या अळ्या आढळल्या आहेत. यात अनेक सेलिब्रेटी, आयएएस अधिकारी व पालिकेच्या रुग्णालयांचाही समावेश आहे. मात्र पालिकेकडून कोणाचेही नाव दिले जात नाही. मलिष्काच्या आईचे नाव मात्र जाहीर करण्यात आल्याने यामागे मलिष्कावर दबाव आणण्याचा प्रयत्न तर नाही ना, अशी टीका बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आली. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र, ‘ही कारवाई नियमानुसार असल्याचे’ म्हटले आहे.

दुसरीकडे, शिवसेनेचे सभागृहनेते यशवंत जाधव यांनी स्थायी समितीच्या बैठकीतही मलिष्कावर नाराजी व्यक्त केली. ‘मलिष्का यांना खड्डे दिसले तर त्यांनी सहाय्यक आयुक्तांकडे त्याबाबत तक्रार करायला हवी होती.  या गाण्यातून तिने केवळ प्रशासनानेच नव्हे तर २३२ नगरसेवकांचे विडंबन केले आहे,’ अशी टीका त्यांनी केली. मलिष्काने आपल्या घरी अनधिकृत बांधकाम केल्याचेही पालिकेच्या निदर्शनास आले असून त्याबद्दलही नोटीस पाठवली जाणार असल्याचे ते म्हणाले.

राजकारणही सुरू

या मुद्दय़ावर आता राजकारण सुरू झाले असून अन्य पक्षांनी आता शिवसेनेची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. ‘रस्त्यावर खड्डे आहेत ही वस्तुस्थिती आहे. मग ते मान्य करण्याचे सोडून सूडबुद्धीने कारवाई का केली जात आहे? ही असहिष्णुता कुठून आली,’ असा सवाल सपचे गटनेता रईस शेख यांनी केला. तर ‘ मुंबईच्या स्थितीची जाणीव करून देणाऱ्यांना आपण धन्यवाद द्यायला हवे. खड्डय़ांची संख्या लपवणे आणि चुका दाखवणाऱ्याला नोटीस बजावणे हे उपाय नाहीत,’ असे विरोधी पक्षनेता रवी राजा म्हणाले. ‘शहरातील खड्डय़ांवरून कोणी टीका करत असेल तर खड्डे बुजवून त्याला उत्तर दिले पाहिजे. अशा प्रकारे लक्ष्य करून भयाचे वातावरण पसरवणे चूक आहे,’ अशी भूमिका भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी मांडली.

‘मुंबई, तुला बीएमसीवर भरोसा नाय’, हे विडंबनगीत शिवसेना आणि पालिकेला झोंबले असताना मुंबईकरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया.

अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी

रेडिओ जॉकी मलिष्काने गाण्याच्या माध्यमातून मुंबईतील रस्त्यांची वस्तुस्थिती समाजासमोर आणली. दररोज मुंबईकर या खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करीत असल्याने त्यांना हे गाणे पटले आणि त्यांनी ते उचलून धरले. मात्र रस्त्यांवरील खड्डय़ांवर काम करण्याऐवजी रेडिओ जॉकी मलिष्कावर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. मलिष्कावर विविध मार्गाने कारवाई करीत पालिका अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी करीत आहे.

डॉ. आशीष भोसले, पॅथलॉजिस्ट

 कारवाईपेक्षा सुधारणांकडे लक्ष द्या

खड्डय़ांची बाब गंभीर असल्याने त्याबाबत आवाज उठवणे गरजेचे होते. अशातच मनोरंजन क्षेत्राच्या माध्यमातून यावर आवाज उठवला गेल्यामुळे यावर अधिक विचार होण्यास सुरुवात झाली आहे.

 – डॉ. नंदिनी देशमुख, निवृत्त प्राध्यापिका

गर्भवतींना धोका

गर्भवतींना रस्त्यावरून प्रवास करणे सोयीचे राहिलेले नाही. रस्ते कमी आणि खड्डेच जास्त असल्याने स्त्रीरोगतज्ज्ञ गर्भवती महिलांना प्रवास टाळण्याचा सल्ला देतात. अनेक  महिला खड्डय़ांच्या भीतीने गाडीने प्रवास करणे टाळतात. त्यामुळे मलिष्काला नोटीस पाठविण्यापेक्षा खड्डे बुजवावेत.

डॉ. मोहन गेडाम, स्त्रीरोगतज्ज्ञ

आधी खड्डय़ांकडे लक्ष द्या!

मुंबईतील रस्त्यांची परिस्थिती भीषण आहे हे पालिकेनेही मान्य करायला हवे. रेडिओ जॉकी मलिष्का हिने पालिकेच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे तिच्यावर सूड घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मूळात मुंबईतील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत पालिका कायम एमएमआरडीएकडे बोट दाखवते. मात्र दोन्ही विभागांच्या या भांडणाचा सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पालिकेने आधी खड्डय़ांकडे लक्ष द्यावे.

वसंत पाटील, अभियांत्रिकी सल्लागार व सामाजिक कार्यकर्ते