नव्या वर्षांच्या सुरुवातीपासूनच मध्य रेल्वेवरील हार्बर मार्गाची वाहतूक अनेकदा दिरंगाईने सुरू असल्याने प्रवासी हैराण आहेत. मात्र या दिरंगाईमागे एका चोराचा मोठा वाटा असल्याचे उघडकीस आले आहे. वांद्रे येथे राहणारा हा चोर रात्रीच्या वेळेत हार्बर मार्गाच्या गाडय़ांमधील महत्त्वाची वायर तोडून विकत होता. त्यामुळे सकाळी या गाडय़ा जागच्या जागी उभ्या राहायच्या आणि परिणामी हार्बर मार्गावरील फेऱ्या रद्द करण्याची पाळी मध्य रेल्वेवर येत होती.
वांद्रे येथील भारत नगरात राहणारा फरीन यादव हा रिक्षा चालवण्याचे काम करतो. मात्र जास्त पैसे कमवायच्या लालसेपोटी फरीन रात्रीच्या वेळी सायडिंग किंवा कारशेडला उभ्या असलेल्या रेल्वेगाडय़ांमधील केबल तोडून विकण्याचे काम करत होता. फरीन रेल्वेच्या डब्यामधील ‘ट्रॅक्शन केबल मोटर’ ही वायर कापत असे. ओव्हरहेड वायरमधून येणारा विद्युत प्रवाह रेल्वेगाडीपर्यंत पोहोचवण्याचे काम ही वायर करते. ही वायर तुटल्यास गाडी जागेवरून हलणेही कठीण असते.
ही केबल तोडण्यासाठी फरीन दर रात्री वांद्रय़ाहून हार्बर मार्गावरील पनवेल किंवा मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे जाणारी गाडी पकडत असे. वडाळा येथे उतरून तो पनवेलला जाणाऱ्या गाडीने सानपाडा अथवा वाशी येथे उतरत होता. रात्री १२ ते दोन या वेळेत तो आपली कामगिरी फत्ते करत असे. तसेच या वायरी विकण्यासाठी तो वांद्रे किंवा पश्चिम उपनगरांतील दुकानांचा आसरा घेत असे, असे रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आलोक बोहरा यांनी
सांगितले.
फरीनने अविनाश आणि चंदर या आपल्या चुलत भावांसह फेब्रुवारी महिन्यात वाशी येथील सायिडगमध्ये, मार्चमध्ये वाशी, सानपाडा कारशेड आणि ठाणे सायडिंग येथे, एप्रिलमध्ये वाशी, जुलैमध्ये वाशी, सानपाडा आणि बेलापूर येथे उभ्या असलेल्या गाडय़ांमधून ही केबल चोरी केली होती. या केबलची किंमत बाजारात ५०० रुपये एवढीच होती. या वेळी एप्रिलमध्ये त्याला वाशी येथून अटकही झाली होती. मात्र तो परत सुटला आणि चोरी करणे चालूच ठेवले. अखेर बुधवारी रेल्वे सुरक्षा दलाने सानपाडा येथे केबल कापतानाच त्याला पकडले. न्यायलायाने फरीनला एका दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
कारशेड आणि सायिडगच्या सुरक्षेचे काय?
फरीन यादवच्या या केबल चोरीमुळे कारशेड आणि सायडिंग येथे असलेल्या लोकल गाडय़ांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. रेल्वे सुरक्षा दल या ठिकाणी सुरक्षा देण्यास अपयशी ठरत असल्याचे समोर आले आहे. रेल्वे सुरक्षा दलानेही आता कारशेड व्यवस्थापनांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत आणि सुरक्षा व्यवस्थेचेही कंत्राट देण्याबाबत पत्र लिहिले आहे. सुरक्षा दलातील रिक्त जागांचे प्रमाण जास्त असल्याने ही परिस्थिती ओढावली आहे.