मुंबई शहरामध्ये नाक्यावर वेगवेगळ्या खाद्यपदार्थाचा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या कमी नाही. वडापाव आणि भुर्जीपावची गाडी तर आपल्याला प्रत्येक नाक्यावर दिसेल. पण गेली तीस वर्षे दादरच्या गोखले रोडवरील सचिन हॉटेलसमोरच्या कोपऱ्यावर रोज संध्याकाळी मालवणी पद्धतीच्या पदार्थाची जणू जत्राच भरते. मूळचे वेंगुर्ला, तुळसगावचे असलेल्या राजू सावंत ऊर्फ राजू यांची आई गुणवंती गोविंद सावंत यांनी १९८६ साली ‘राजू मालवणी कॉर्नर’ची सुरुवात केली. त्यावेळी कीर्ती महाविद्यालयात शिकणारे राजू अभ्यास सांभाळून आईला व्यवसायात मदत करत असत. आता ते पूर्णवेळ याच व्यवसायात असून त्यांची पत्नी, मुलगा आणि सासरेसुद्धा गाडी सांभाळण्याचं काम करतात.

अतिशय माफक दरात घरगुती पद्धतीचे केवळ मालवणी पद्धतीचे मांसाहारी पदार्थ तुम्हाला येथे चाखायला मिळतात. त्यामुळे मटण आणि चिकन बिर्याणी तुम्हाला येथे मिळणार नाही. पण मालवणी लोकांची खासियत असलेला कोलंबी भात मात्र आवर्जुन मिळेल. ऑर्डर दिल्यानंतर पुढील पाच ते दहा मिनिटांतच गरमागरम पदार्थाचे ताट तुमच्यासमोर सादर केले जाते.

ओल्या नारळाचं भरपूर वाटण लावून केलेली कोंबडी सागोती आणि वडे ही राजू मालवणी कॉर्नरची खासियत. ब्रॉयलर कोंबडी ही पटकन शिजत असली तरी ती चवीला खास नसते. म्हणून येथे कोंबडीच्या सर्व पदार्थासाठी इंग्लिश कोंबडीच वापरली जाते. त्याचबरोबर कोंबडी मसाला, मटन मसाला, खिमा, कलेजी, बांगडय़ाचा रस्सा या सगळ्याचा तुम्ही तांदूळ, ज्वारी, बाजरीची भाकरी आणि आंबोळीसोबत आस्वाद घेऊ शकता. माशांमध्येसुद्धा सुरमई, पापलेट, हलवा फ्राय, खेकडे, सुका जवळा ही खास मालवणी पद्धतीने तयार केलेली मासोळी तुम्हाला येथे चाखायला मिळेल. सर्व पदार्थ घरून तयार करून आणले जातात. फक्त कोंबडी वडे (वडय़ाचं पीठ बाहेरून विकत न आणता घरीच तयार केलं जातं.) आणि मासे तळण्याचं काम गाडीवर केलं जातं. येथे मिळणारी सोलकढीसुद्धा खासच. कारण त्यासाठी कोकणातून आणलेला आगळच वापरला जातो. त्यामुळे पोटभर कोंबडी वडे खाल्ल्यानंतर तृप्तीचा ढेकर देण्यासाठी ग्लासभर सोलकढीची ऑर्डर प्रत्येक गिऱ्हाईकाकडून आवर्जुन दिली जाते.

गाडीवर शाकाहारी पदार्थ मिळत नसले तरी लग्नाच्या आणि इतर छोटेखानी समारंभाच्या ऑर्डरही येथे घेतल्या जातात. तुमच्या आवडीप्रमाणे हव्या त्या पद्धतीचं शाकाहारी जेवण तयार करून दिलं जातं.

दादर हे मुंबई शहराचं मध्यवर्ती ठिकाण. त्यामुळे या गाडीवरील अस्सल मालवणी पदार्थाची चव चाखण्यासाठी गिरगाव, बोरिवली, भिवंडी, वसई, ठाणे इथपासून येणारे लोक आवर्जून फोन करून येतात. दादर भागातील पुणे, कोकणात कामानिमित्त गेलेली मंडळी मुंबईत आल्यावर त्यांची पहिली पसंती आम्हालाच असते, असं राजू अभिमानाने सांगतात.

एकावेळी जवळपास २०-३० लोक बसण्याची व्यवस्था येथे असली, तरी पार्सल घेऊन जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सोमवार, मंगळवार, गुरुवार या दिवशी गर्दी थोडी कमी असते. अन्यथा वाराच्या दिवशी (म्हणजे बुधवार, शुक्रवार आणि रविवार) लोकांच्या येथे लांबच लांब रांगाही लागलेल्या पाहायला मिळतात. दादर परिसरातील अनेक रहिवासी, मोठय़ा हस्ती आवर्जुन पार्सल घेऊन जातात. त्यामध्ये कलाकार, डॉक्टर, वकील आणि राजकारण्यांचा देखील समावेश आहे. शिल्पा तुळसकर, अतुल परचुरे या मंडळींची नावं उदाहरणादाखल पुरेशी म्हणावी लागतील. काही दिवसांपूर्वीच आजची आघाडीची अभिनेत्री मुक्ता बर्वेसुद्धा येथे आली होती आणि ती देखील इथल्या पदार्थाच्या प्रेमात पडली आहे.

धंदा करण्यासाठी मराठी माणूस तयार होत नाही अशी बोंब असते. परंतु राजू यांनी आपल्या गाडीवर सर्व मराठी मुलांना कामावर ठेवलं आहे. ही मुलंच आता राजू यांच्या देखरेखीखाली जेवण बनवण्यापासून ते गाडीवर ऑर्डर घेण्यापर्यंतची सर्व कामं करतात. गणपतीच्या दिवसांमध्ये ही मुलं कोकणात गावी जातात त्यामुळे फक्त त्या आठ दिवसांमध्ये गाडी बंद असते.

राजू मालवणी कॉर्नर

  • कुठे : अनंत पाटील मार्ग, सचिन हॉटेलसमोर, गोखले रोड, दादर (पश्चिम)
  • वेळ – दररोज संध्या. ७.३० ते ११.३०