प्रश्न सध्या पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी अथवा सध्या सत्ताधारी असलेल्या भाजपचा नाही. तसाच तो सध्या विरोधात असलेल्या काँग्रेसचाही नाही. प्रश्न आहे तो लोकशाही म्हणवून घेणारा देश म्हणून आपण आपल्या भावी पिढय़ांसाठी कोणती व्यवस्था तयार करीत आहोत, हा. तो पडावयाचे कारण म्हणजे एकापाठोपाठ एक नोकरशहा, निवृत्त न्यायाधीश आदींची विविध पदांवर लावली जाणारी वर्णी.

प्रशासकीय सुधारणांची चर्चा करताना अधिकाऱ्यांच्या निवृत्योत्तर सेवांना चाप लावण्याचे सूतोवाच मोदींनीच केले होते.१९८४ सालच्या काँग्रेसच्या विक्रमानंतर सध्याच्या सत्ताधारी भाजपइतके खासदार कोणत्याही पक्षाला निवडून आणता आलेले नाहीत. तरीही त्या पक्षाला मंत्रिपदासाठी लोकप्रतिनिधी मिळू नयेत? याचा अर्थ हे निवडून आलेले भाजपचे खासदार राज्यमंत्रीदेखील होण्याच्या लायकीचे नाहीत? या प्रश्नाचे उत्तर जर होकारार्थी असेल तर मग इतकी प्रशिक्षण शिबिरे, चिंतनसत्रे, बौद्धिके आदी आयोजित करणाऱ्या रा. स्व. संघाच्या यंत्रणेचा उपयोगच काय? आणि या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी असेल तर मग त्यांना संधी नाकारण्याचे काय कारण? हे दोन्हीही प्रश्न परिस्थितीचे गांभीर्यच अधोरेखित करतात. म्हणून प्रश्न पुढील पिढीसाठी आपण अशी पोकळ लोकशाही ठेवणार का, हा आहे.

नवी संस्थात्मक उभारणी शून्य असताना आपण निदान आहे त्या संस्था तरी जपायला हव्यात. हे पोकळीकरण रोखायला हवे, असे मत ‘पोकळीकरण’ या अग्रलेखात मांडण्यात आले आहे. या अग्रलेखावर आपली भूमिका मांडत नागपूर येथील एस. बी. सिटी बिनझानी महाविद्यालयाची विद्यार्थिनी रेणुका पिलारे हा ‘ब्लॉग बेंचर्स’च्या पहिल्या पारितोषिकाचा मानकरी ठरली आहे. या स्पर्धेत अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी अक्षय होतकर याने दुसरे पारितोषिक पटकावले.

अग्रलेखावर मत मांडणाऱ्या रेणुका आणि अक्षय यांनी दर्जेदार लेखन करत ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत बाजी मारली. रेणुकाला सात हजार आणि प्रमाणपत्र तर अक्षयला पाच हजार  रुपये आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात येईल. या अग्रलेखावर व्यक्त होताना राज्यभरातील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांना चालना देत उत्तम लेखन केले. महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थी भरभरून प्रतिसाद देत आहेत. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षिसे काढली जातात.

पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात.

‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना या निमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. या स्पर्धेत सहभागी होऊ   इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.