हजारीमल सोमाणी मार्गावर वाहतूक कोंडी, प्रवाशांच्या गर्दीची समस्या ‘जैसे थे’

वाहतूक कोडी आणि पादचाऱ्यांची वाढती वर्दळ लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकासमोरील हजारीमल सोमाणी मार्गाच्या अध्र्या रुंदीकरणाला स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर वर्ष उलटले आहे. या रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळालेला नाही. रस्ता रुंदीकरणाआड बॉम्बे जिमखाना आणि आझाद मैदानाची जागा जिल्हाधिकाऱ्यांकडून अद्याप हस्तांतरित करण्यात न आल्याने कार्यादेश हाती पडूनही कंत्राटदाराला काम सुरू  करता आलेले नाही. आता पावसाळा जवळ आल्याने या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि पादचाऱ्यांच्या वर्दळीची समस्या नजीकच्या काळात सुटणे अशक्य होऊन बसणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातून फॅशन स्ट्रीटच्या दिशेने जाणारा सोमाणी मार्ग फार अरुंद आहे. फॅशन स्ट्रीट परिसरातून मोठय़ा संख्येने वाहने याच मार्गावरुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातून पुढे शहरातील विविध भागात जातात. त्यामुळे या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होते, तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात उतरणारे हजारो प्रवासी या मार्गावरून कार्यालयात मार्गस्थ होत असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि पादचाऱ्यांच्या वर्दळीत कायम हा रस्ता हरवलेला असतो. विकास आराखडय़ातील तरतुदीनुसार या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आणि रस्ते विभागाने निम्म्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव तयार करुन गेल्या वर्षी जुलै महिन्यात स्थायी समितीमध्ये सादर केला होता. स्थायी समितीने प्रस्ताव मंजूर केल्यानंतर भव्य एन्टरप्राइजेस कंपनीला ५.२७ कोटी रुपयांचे काम देण्यात आले. काही दिवसांमध्येच कंत्राटदाराला कार्यादेशही देण्यात आले. त्यानंतर हजारीमल सोमाणी मार्गाच्या पुढील भागाच्या रुंदीकरणाचा विचार प्रशासन पातळीवर सुरू झाला. त्यासाठी बॉम्बे जिमखाना आणि आझाद मैदानातील काही जागेची आवश्यकता आहे. त्याबाबत पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला आहे. परंतु अद्याप त्यावर कोणताही निर्णयही झालेला नाही. त्यामुळे हजारीमल सोमाणी मार्गाचा पुढील निम्म्या भागाच्या रुंदीकरणाचे घोंगडे भिजतच पडले आहे.

वाहतुकीचीही समस्या

स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर वर्ष होत आले तरी निम्म्या रस्त्याच्या रुंदीकरणाला अद्याप सुरुवात झालेली नाही. रस्त्यांची सुरू केलेली कामे मे महिन्याच्या अखेरीस बंद केली जातात. मात्र या रस्त्याचे कामच सुरू झालेले नाही. आता पावसाळा जवळ आल्यामुळे या रस्त्याचे काम हाती घेता येणार नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आझाद मैदानातील काही सरकारी कार्यालयांच्या अखत्यारीत असलेला मोकळा भाग पालिकेला हस्तांतरीत केल्यास पावसाळय़ानंतर या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू करता येईल. अन्यथा या रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि पादचाऱ्यांची गर्दी ‘जैसे थे’च राहण्याची चिन्हे आहेत.