राज्यातील सत्ताधारी भाजपच्या घटक पक्षांची मंत्रिपदांऐवजी महामंडळावर बोळवण करण्यात येणार असल्याचे समजते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांची महाराष्ट्र यंत्रमाग महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करून घटक पक्षांना सत्तेचा वाटा देण्यास सरकारने सुरुवात केली आहे.
रिपब्लिकन पक्षाला चार महामंडळे देण्याची तयारी सुरू आहे. महामंडळे मिळाली तरी निवडणुकीत झालेल्या उभयपक्षी कराराप्रमाणे मंत्रिपदही रिपाइंला मिळाले पाहिजे, त्याचा आग्रह कायम राहणार आहे, असे पक्षाचे सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी सांगितले.
भाजपने  रिपाइंला १० टक्के सत्तेत वाटा देण्याचा भाजपने करार केला होता. त्यात केंद्रातील, राज्यातील मंत्रिपदे व महामंडळांचा समावेश आहे. राज्यात भाजपचे सरकार आले तरी रिपाइंला अजून सत्तेचा वाटा मिळालेला नाही. इतर घटक पक्षांचीही तशीच अवस्था झाली. त्यामुळे या पक्षांमधून जाहीरपणे भाजप सरकारवर नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
गेल्या आठवडय़ात आठवले यांच्या अध्यक्षतेखाली घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्रपक्षाच्या नेत्यांना वर्षांवर बोलावून घेऊन त्यांना सत्तेत सहभागी करून घेण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार घटक पक्षांना महामंडळे देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या संदर्भात अविनाश महातेकर यांच्याशी संपर्क साधला असता, रिपाइंला चार महामंडळे मिळणे अपेक्षित आहे, परंतु त्याबरोबर मंत्रिपदाचाही आग्रह कायम राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.