निवडणूक कामांच्या पाश्र्वभूमीवर शिकाऊ वाहन परवान्यांसाठी हजारो अर्जदारांच्या रद्द करण्यात आलेल्या वेळांबाबत प्रादेशिक परिवहन विभागाने फेरनिर्णय घेतला असून आता अशा हजारो अर्जदारांना मतदानानंतर नवीन वेळ देण्यात आली आहे. तसेच २२, २३ आणि २४ एप्रिल या दिवशी व १६ मे रोजी मतमोजणीच्या दिवशी अंधेरी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय बंद राहणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयासह अंधेरी, ताडदेव आणि वडाळा येथील कार्यालयांतील बहुतांश कर्मचारी निवडणूक कामांसाठी गेल्याने शिकाऊ परवान्यांसाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदवलेल्या वेळा रद्द करण्यात आल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने नुकतेच प्रसिद्ध केले होते.
राज्य परिवहन विभागाच्या अंधेरी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिकाऊ परवान्यासाठी ऑनलाइन पद्धतीने वेळा नोंदवण्यात येतात. मात्र या विभागातील बहुतांश कर्मचाऱ्यांना निवडणूक कामे लावण्यात आल्याने हे कर्मचारी व्यग्र आहेत. त्यामुळे १५-१६ एप्रिल या दिवशी शिकाऊ परवान्यासाठी ऑनलाइन वेळ नोंदवलेल्या लोकांच्या वेळा रद्द केल्या. लोकांनी इतर वेळा घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना जून महिन्याशिवाय वेळा मिळाल्या नाहीत. याबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रसिद्ध केले होते.