गुंतवणूकदारांचे तब्बल २० हजार कोटी अडकवून ठेवणारे सहाराचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांच्या जामिनाकरिता मालमत्ता विकून पैशाची जमवाजमव करणाऱ्या सहारा ग्रुपने वसई येथील सुमारे २६५ एकर भूखंड विकून ११११ कोटींची विक्रमी माया गोळा केली आहे. चित्रपटांना अर्थपुरवठा करणारा हिरे व्यापारी भरत शाह आणि वसई-विरारमध्ये बांधकाम क्षेत्रात  ‘अमेय ग्रुप’ या नावे परिचित असलेल्या ‘साई रिदम रिएलिटी प्रा. लि.’ ने हा दणदणीत सौदा केला आहे. वसईत एखाद्या बांधकाम कंपनीने एवढा मोठा भूखंड खरेदी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुंबईतून स्थलांतरित होऊन मीरा रोडपाठोपाठ वसई-विरारमध्ये छप्पर शोधणाऱ्या मध्यमवर्गीयांचे प्रमाण वाढत असल्याने हा व्यवहार महत्त्वाचा ठरतो.

‘सहाराश्री’ सुब्रतो रॉय यांच्या जामिनासाठी तब्बल १० हजार कोटी रुपये जमा करता यावे यासाठी सहाराने आपल्या अनेक मालमत्ता विक्रीसाठी काढल्या आहेत. गुरगाव, पुणे, दिल्लीपाठोपाठ वसईतील हा भूखंडही सहाराने विक्रीसाठी काढला होता. परंतु मंदीमुळे त्याला फारसा भाव मिळत नव्हता. ऑगस्टमध्ये अतुल प्रोजेक्टस्ने या भूखंडासाठी ८०० कोटी रुपये देऊ केले होते. मात्र सहाराला हा व्यवहार पसंत नव्हता. अखेरीस भरत शाह यांच्या मदतीने साई रिदमने ११११.५ कोटी देऊ केले आणि ते अखेर सौदा ठरला. इतकेच नव्हे तर ५ नोव्हेंबर रोजी याबाबत सहारा आणि भरत शाह यांच्या प्राईम डाऊनटाऊन इस्टेट प्रा. लि. व साई रिदम रिएलिटी प्रा. लि. यांच्यात करारही झाला आहे. या व्यवहाराच्या करारनाम्याची प्रत ‘लोकसत्ता’कडे आहे. या करारानुसार सहाराला लगेच ही रक्कम उपलब्ध करून द्यायची आहे. त्यानुसार कंपनीने जुळवाजुळव सुरू केली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

विरार-पालघर परिसरात एचडीआयएलने मोठय़ा प्रमाणात भूखंड खरेदी केली असली तरी ती सलग नाही. वसईतही अनेक बडय़ा विकासकांनी भूखंड खरेदीचा सपाटा लावला आहे. मात्र इतक्या मोठय़ा प्रमाणात पहिल्यांदात भूखंड खरेदी झाली आहे, असे कारुळकर यांनी मान्य केले. मात्र भविष्यात इतक्या मोठय़ा परिसरात गृहप्रकल्प राबविला जाणार आहे किंवा नाही, याबाबत त्यांनी मौन पाळले. या शेजारीच साई रिदमच्या मालकीचा सुमारे ५० एकर भूखंड असल्याचे कळते. भविष्यात लवासासारखे स्वतंत्र शहर उभारण्याचा प्रयत्न असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. मात्र याबाबत दुजोरा मिळू शकला नाही.

मुंबई व आसपासच्या परिसरातील काही मोठे भूखंड व्यवहार
*लोअर परळ येथील डीएलएफच्या मालकीचा १७ एकर भूखंड : २७२५ कोटी (लोढा ग्रुप)
*ठाण्यातील क्लॅरिएंट इंडियाचा ८८ एकर भूखंड : ११५४ कोटी (लोढा ग्रुप)
*बोरिवलीतील टाटा स्टीलचा २५ एकर भूखंड : ११५५ कोटी (ओबेरॉय रिएलिटी)
*क्रॉम्पट ग्रीव्हज कंपनीचा भांडुप येथील ३४ एकर भूखंड : १०१५ कोटी (रुनवाल ग्रुप)
*जीव्हीकेकडील विमानतळाजवळील भूखंड : ५८० कोटी (ओएसिस)
*डोंबिवलीतील गॅमॉन इंडियाकडील ६४ एकर भूखंड : ३२० कोटी (रुणवाल)
*ठाण्यातील केईसी इंटरनॅशनला ७ एकर भूखंड : २१४ कोटी (टाटा सन्स)

‘साई रिदम रिएलिटी’चे प्रवक्ते व संचालक प्रशांत कारुळकर यांनी हा करारनामा झाल्याचे मान्य केले. सहारा ग्रुपच्या सात कंपन्या तसेच भरत शाह यांची प्राईम डाऊनटाऊन इस्टेट व साई रिदम यांच्यात करारनामा झाला आहे. याबाबत सहारा ग्रुपचे प्रवक्ते अभिजित सरकार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणी काहीही सांगण्यास नकार दिला.