अतिरेकी हल्ल्यांसह हिंसक मोर्चे, आंदोलनांमुळे सतत अशांत असलेल्या काश्मीर खोऱ्यात कधी पर्यटक तर कधी पहाडी वेश परिधान करत गावकरी बनून मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने सज्जाद मुघल या आरोपीला अटक केली. तब्बल दीड वर्ष अटक टाळण्यासाठी खोऱ्यात दडून बसलेल्या सज्जादला अटक करून मुंबईत आणेपर्यंत विशेष पथकाचा प्रवास अत्यंत खडतर होता. अगदी सज्जादला ताब्यात घेतल्यानंतर विमानतळाच्या दिशेने येत असताना श्रीनगरमध्ये पोलीस, स्थानिकांमध्ये धुमश्चक्री कशी सुरू होती याच्या सुरस कथा अधिकाऱ्यांकडून ऐकायला मिळत आहेत.

आईच्या आजारपणाचे कारण पुढे करत सज्जादने पॅरोल मिळवला. मे २०१६ मध्ये त्याला नाशिक कारागृहात परतायचे होते. मात्र तो परतला नाही. सज्जाद पसार झाला हेच मुळात मुंबई पोलिसांना जुलैमध्ये समजले. नाशिक पोलिसांनी दोन वेळा पाकिस्तान सीमेवरील उरी तालुक्यातील सज्जादच्या मूळ गावी जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. पण पोलीस पथकावर हल्ला झाला. काही पोलीस जखमीही झाले. यानंतर सज्जादला पकडण्याची जबाबदारी गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने आपल्या हाती घेतली.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पथकाचे प्रमुख संजय निकम आणि त्यांचे निवडक सहकारी पहिल्यांदा बारामुल्ला जिल्ह्यात गेले. सज्जाद खोऱ्यात दडून आहे ही माहिती होती. पण कुठे ते माहीत नव्हते. त्यामुळे पहिल्या फेरीत बारामुल्ला, उरी आणि सज्जादचे गाव सलामाबाद इथली भौगोलिक परिस्थिती, गावकऱ्यांचा स्वभाव, मानसिकता, त्यांचा पेहराव, त्यांची बोलीभाषा या सर्व गोष्टींचा अभ्यास करणे महत्त्वाचे होते. ‘पर्यटक बनून आम्ही अभ्यास करत होतो. तेव्हा लक्षात आले की पोलीस किंवा लष्कराबाबत जनतेच्या मनात प्रचंड चीड आहे. वेगळ्या दिसणाऱ्या किंवा परराज्यातून आलेल्या व्यक्तीकडे संशयाच्या नजरेतून पाहिले जाते किंवा पाळत ठेवली जाते.

दुसरीकडे स्थानिक पोलिसांना सोबत घेऊन शोधाशोध केल्यास सज्जाद सतर्क होऊन तावडीतून निसटण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे ओळख लपवून ही कारवाई करावी लागणार होती,’ असे निकम यांनी सांगितले.

सर्वात आधी या पथकाने फेरन हा पहाडी वस्त्रप्रकार विकत घेतला. थंडीपासून बचाव करण्यासाठी संपूर्ण शरीर झाकले जाईल, अशी फेरनची रचना. पण फेरन घातल्यावर चालणे, बसणे नवख्याला सहज शक्य नाही. म्हणून सवय होईपर्यंत फेरन घालून सहज वावरण्याचा सराव केला. पहाडी लोकांसारखी कमीअधिक दाढी ठेवली.

हळूहळू त्यांच्या लक्षात येऊ लागले की सज्जाद या भागात प्रसिद्ध होता. पण पल्लवी पुरकायस्थ हत्येच्या गुन्ह्यात पोलिसांनी अडकवले, अशी माहिती असल्याने त्याला गावात सहानुभूती होती.

सज्जाद हा स्वत: मोबाइल वापरत नव्हता. त्यामुळे तो नेमका कुठे आहे, त्याचा दिनक्रम काय हे समजणे कठीण होते. परिणामी यासाठी खबरे तयार करणे महत्त्वाचे होते. या भागात पर्यटक म्हणून फिरताना आडोशाला किंवा एकाकी टपऱ्या, दुकानांपासून त्यांनी सुरुवात केली.

नंतर गावकरी म्हणून मदत करू शकतील, अशा लोकांशी जवळीक साधून माहिती काढण्यास सुरुवात केली. बऱ्याच प्रयत्नांनंतर त्या भागात त्यांच्या हक्काचे खबरे तयार केले. परंतु सज्जाद आपल्या गावी येतच नव्हता. तो निरनिराळ्या नातेवाईकांच्या गावी वास्तव्य करत होता.

अटक टाळण्यासाठी काळजी घेत असल्याने पथकाच्या खबऱ्यांनाही नेमकी माहिती मिळत नव्हती.

अखेर दोन आठवडय़ांपूर्वी सोनमर्ग येथील एका बोगद्याच्या कामासाठी सज्जाद बारामुल्ला सोडून श्रीनगर-लेह महामार्गावरील गगनगीर या गावी जाईल, अशी पुसटशी कल्पना खबऱ्यांकडून मिळाली. पहिले दोन दिवस पथकाने सोनमर्ग पिंजून काढले.

त्यानंतर गावकरी बनून मजुरांच्या खानावळींवर पाळत ठेवली. अखेर मंगळवारी दुपारी एका खानावळीवर सज्जाद सापडला. श्रीनगर असो किंवा बारामुल्ला कुठेही इतके दिवस ओळख दडवून वास्तव्य करणे आमच्यासाठी आव्हान होते. गावकऱ्यांना संशय आला असता तर ते आमच्या जीवावर बेतू शकले असते, अशी प्रतिक्रिया निकम व त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी या वेळी बोलताना दिली.

हिंसक आंदोलनाला तोंड

सज्जादला तिथून ताब्यात घेऊन श्रीनगर विमानतळावर येत असताना स्थानिकांनी हिंसक आंदोलन पुकारले. तुंबळ दगडफेक सुरू झाली. जमावाने जाळपोळीला हात घातला. पोलीस आणि स्थानिक आमनेसामने आले. यात सज्जादला अटक करणाऱ्या पथकाची गाडी फसली. चालक स्थानिक असल्याने त्याने गाडी कशीबशी तेथून काढली आणि अन्य मार्गावरून पथकाला सुखरूप विमानतळावर पोहोचवले.