हल्लीच्या पिढीला माणसांपेक्षा यंत्रावर अधिक प्रेम अशी ओरड जुन्या पिढय़ांकडून होत असते. पण ही पिढी माणसांचाही तितकाच विचार करते याचे उत्तम उदाहरण नुकतेच शालेय विद्यार्थ्यांनी घेतलेल्या पुढाकारातून दिसून आले आहे. इतर वेळी आपला खाऊ दुसऱ्याला देताना कचरणाऱ्या चिमुकल्यांनी खाऊच्या पैशांतील काही भाग बाजूला काढून ती रक्कम दुष्काळग्रस्तांना देण्याचे ठरविले. नुसतेच ठरविले असे नाही तर त्यांनी तो संकल्प पूर्णत्वासही नेला. त्यांच्या या पुढाकाराचे शिक्षणमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांनाही कौतुक केले. हे विद्यार्थी आहेत मुलुंड येथील लक्ष्मीबाई इंग्रजी माध्यम शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील.
या शाळेत गांधी जयंतीनिमित्त ‘तावडेसरांशी गप्पा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी मनमुराद गप्पा मारल्या. इतकेच नव्हे तर त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांनाही मोकळेपणानी उत्तरे दिली. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक तसेच शाळेचे संचालक आणि मुख्याध्यापक प्रसाद कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक पूजा कुलबर्णी इतर सर्व शिक्षक उपस्थित होते.
भारताच्या डिजिटल इंडिया मोहिमेमध्ये विद्यार्थ्यांसह पालकांनीही सहभागी व्हावे, असे तावडे यांनी या वेळी नमूद केले. तर आपला मुलगा दिवसभर इंटरनेट किंवा मोबाइल वापरत असतो अशी अनेक पालकांची तक्रार असते. पण तो नेमका इंटरनेटवर काय पाहात असतो हे समजून घेण्यासाठी तरी पालकांनी तंत्रसाक्षर होणे गरजेचे असल्याचे तावडे यांनी या वेळी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या खिलाडूवृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी शासन काय प्रयत्न करीत आहे या प्रश्नाला उत्तर देत असताना तावडे म्हणाले की, यासाठी शासन प्रयत्नशील असून दहावीच्या विद्यार्थ्यांना आठवडय़ातून एक जादा तास खेळण्यासाठी देण्यात येणार आहे. तसेच या जादा तासाचे गुणही विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन वाढावे किंवा विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन करावे यासाठी माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतल्याचेही तावडे यांनी या वेळी विद्यार्थ्यांना सांगितले. गप्पांचा कार्यक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या दुष्काळग्रस्त निधीसाठी जमविलेल्या २५ हजार रुपयांचा धनादेश तावडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. ही बाब शिक्षणमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली त्या वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि काही विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी बोलावले. त्या वेळी त्या विद्यार्थ्यांनी तोच धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. या वेळी उपस्थित विद्यार्थी व मुख्याध्यापकांशी मुख्यमंत्र्यांनी मनमोकळा संवाद साधला.