विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी ‘सह्य़ाद्री’ अतिथिगृहावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. पवार आणि चव्हाण यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली. सिंचनाची श्वेतपत्रिका, मंत्रिमंडळाचा विस्तार, इंदू मिल प्रश्न, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरून निर्माण झालेला वाद आदी मुद्दय़ांवर या वेळी चर्चा झाल्याचे सूत्रांकडून समजते.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला येत्या ११ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात सरकारकडून एमएमआरडीए, तसेच सिंचनाची श्वेतपत्रिका मांडली जाणार आहे. जलसंपदा विभागाने सिंचनाची श्वेतपत्रिका तयार करून ती मुख्यमंत्री कार्यालयाला सादर केली आहे. राज्यातील किती जमीन पाण्याखाली आली, सिंचनावरचा खर्च का वाढला आणि सिंचनाचे पाणी कोणत्या शहरांना देण्यात आले, याचा ऊहापोह श्वेतपत्रिकत करण्यात आला आल्याचे समजते. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत श्वेतपत्रिकेला अंतिम रूप द्यावे आणि अधिवेशनातही त्यावर जास्त जोर देऊ नये. त्याचप्रमाणे एमएमआरडीएच्या प्रकल्पांवरही श्वेतपत्रिका काढण्यात आली असून त्याबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे कळते.
रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी इंदू मिलच्या जमिनीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा त्वरित हस्तांतरित करावी, अशी रिपब्लिकन नेत्यांची मागणी आहे. त्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी ६ डिसेंबरला आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या पाश्र्वभूमीवर इंदू मिलच्या जमिनीबाबत पवार यांनी चव्हाण यांच्याकडून माहिती घेतल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवाजी पार्कवर स्मारक उभारण्यात येणाऱ्या अडचणींबाबतही मुख्यमंत्र्यांनी पवार यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले जाते.
सिंचनाची श्वेतपत्रिका मांडल्यानंतर मंत्रिमंडळ फेरबदलाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस आहे.
काही महिन्यांपूर्वी आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीने मंत्रिमंडळातील बदलाची मागणी केली होती. त्यामुळे अधिवेशनानंतर मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलाबाबतही चर्चा झाल्याचे समजते.