राष्ट्रवादी मेळाव्यात शरद पवार यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल
हे सरकार नालायकांचे आहे, असे म्हणता मग या नालायकांबरोबर सत्तेत का राहाता, असा खडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सतराव्या वर्धापन दिन समारंभात त्यांनी शिवसेनेला लायक लोकांबरोबरच राहायचे असते, असा सल्ला देतानाच भाजप आणि काँग्रेसवरही सडेतोड टीका केली. देशात दुष्काळी परिस्थिती असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौरे काढत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
केंद्रात निजामाच्या बापाचे राज्य आहे, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर युतीत जोरदार धुसफूस सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनीही वेळोवेळी केंद्रातील व राज्यातील सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. या पाश्र्वभूमीवर पवार यांनी सेनेला हा सवाल केला. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आघाडी केली असती तर सत्ता गेली नसती आणि ही वेळ आली नसती, असे मत पवार यांनी व्यक्त केले. सत्ता जाण्यास पवार यांनी प्रथमच काँग्रेसला उघडपणे दोषी ठरविले. आघाडी होईल या आशेवर सर्व जागा लढविण्याची आमची तयारी झाली नव्हती. काँग्रेसने ऐनवेळी दगा दिला, असेही ते म्हणाले.
मोदी यांच्यावर जोरदार टीका करताना पवार म्हणाले की, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भेटीने फारसे काही साधणार नाही. कारण ओबामा लवकरच अध्यक्षपदावरून पायउतार होणार आहेत. मोदी यांच्या जाहिरातबाजीवर बोट ठेवतानाच, देशात आता भाजपच्या ओहटीची प्रक्रिया सुरू झाल्याचे ते म्हणाले. मुंबई विमानतळ परिसरात २३ हजार घरे गेली तीन-चार वर्षे बांधून तयार आहेत, पण त्याचे वाटप केले जात नाही, याकडे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी लक्ष वेधले होते. याचा उल्लेख करून शरद पवार यांनी, सरकारने १५ दिवसांत वाटप केले नाही तर लोकांना त्या घरांचा ताबा पक्षाने द्यावा, असा आदेशच पवार यांनी दिला. करायचे म्हटले की करायचे, मग कशालाही घाबरायचे नाही, असेही पवार यांनी सांगितले. तर देश मुस्लीममुक्त केला पाहिजे, हे विधान करणाऱ्या साध्वी प्राची यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका, अशी आक्रमक भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनीही मांडली. खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सचिन अहिर, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील आदींचीही यावेळी भाषणे झाली.

सोळावे वरीस धोक्याचे!
काही नेत्यांना झालेली अटक, भ्रष्टाचारावरून पक्षावर सातत्याने होणारे आरोप यामुळे सोळावे वरीस पक्षासाठी धोक्याचे ठरले, अशी जाहीर कबुलीही पवार यांनी दिली. या गोष्टींचे खापर त्यांनी प्रथमच जाहीरपणे काँग्रेसवरही फोडले. काँग्रेस पक्ष आणि तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे राष्ट्रवादीवर ही वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.

फक्त भांग बदलला!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना हे सरकार दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप पवार यांनी केला. पृथ्वीराज चव्हाण जाऊन फडणवीस आले, पण भांग बदलला बाकी सारे तसेच आहे, असा टोलाही त्यांनी लगाविला.

पवारांचा इतिहास सरकारे पाडण्याचा!
* काँग्रेसमुळे आघाडी होऊ शकली नाही, अन्यथा पुन्हा सत्ता आली असती, हा शरद पवार यांनी केलेला दावा साफ चुकीचा असल्याचे प्रत्युत्तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.
* आघाडी व्हावी ही काँग्रेसची इच्छा होती, आम्ही काही जास्त जागाही दिल्या होत्या. सेना-भाजप युती तुटल्याची घोषणा होताच लगेच राष्ट्रवादीने आघाडी तोडली. राजभवनवर जाऊन सरकारला दिलेला पाठिंबा मागे घेतल्याचे पत्रही दिले, याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले.
* यावरून भाजपला मदत करण्याचा राष्ट्रवादीचा डाव होता हे स्पष्ट झाले. १९७८ आणि २०१४ मध्ये राज्यात काँग्रेसची सरकारे पवारांमुळेच पडल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला.