गेल्या निवडणुकीत सर्वाधिक १४ जागा मिळवूनही सेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी झालेली भाजप आणि राष्ट्रवादीची मैत्री राज्यातील राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरली होती. विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार किसन कथोरे भाजपवासी झाल्याने शहरातील सत्ता समीकरण पुन्हा बदलले. या वाढलेल्या ताकदीच्या जोरावर पालिकेतील सेनेचे वर्चस्व पूर्णपणे मोडीत काढण्याचे प्रयत्न भाजप एकीकडे करीत आहे, तर दुसरीकडे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपला शहरात वरचढ होऊ न देण्यासाठी प्रयत्न केले.
गेल्या निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा प्रभाव पडल्याने बदलापुरात मनसेच्या तीन जागा आल्या होत्या; परंतु मध्यंतरीच्या काळात झालेली पक्षाची घसरण पाहता आता मनसेचे सहाच उमेदवार रिंगणात आहेत, तर पक्षाचा सध्या एकच नगरसेवक निवडणूक लढवत असून उर्वरित दोन नगरसेवकांपैकी एक शिवसेनेत गेला असून दुसरा भाजपमध्ये गेला. तर काँग्रेस व राष्ट्रवादीला उतरती कळा लागली असून काँग्रेसची एकमेव नगरसेविका शिवसेनेत गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचीही अशीच स्थिती असून कथोरे भाजपत गेल्यावर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे पाच नगरसेवक गेले आहेत, तर उरलेले चार नगरसेवक हे शिवसेनेत दाखल झाले आहेत. काँग्रेसने अकरा व राष्ट्रवादीने अठ्ठावीस उमेदवार स्वबळावर उभे केले आहेत.

चौथी मुंबई म्हणून गवगवा केलेल्या बदलापूर पालिकेच्या निवडणुकीत केंद्रात आणि राज्यात सत्तेत सहभागी असलेले शिवसेना आणि भाजप या दोनच पक्षांमध्ये मुख्य लढत आहे. गेल्या वेळच्या तुलनेत यंदा तेरा प्रभाग वाढून ते आता ४७ झाले आहेत.   

समस्या कधी सुटणार?
* पालिका अस्तित्वात येऊन वीसपेक्षा जास्त वर्षे झाली असून पालिकेची अद्याप स्वत:ची इमारत उभी राहिलेली नाही, तर अनधिकृत व विकासकामांमध्ये बाधित झालेल्यांसाठी बांधण्यात आलेला बीएसयूपी प्रकल्प अर्धवट असून संथगतीने येथील कामे सुरू आहेत.
* भुयारी गटार योजनादेखील पूर्णत्वास गेलेली नाही. रेल्वे स्थानक परिसरात अजून न झालेले वाहनतळ हे या शहरातील वास्तव आहे.
* पालिकेतील काही कामांच्या बाबतीत पालिकेतील लोकप्रतिनिधींमार्फत झालेला भ्रष्टाचार उघड झाला असून ही प्रकरणे मुंबई उच्च न्यायालयात अद्याप न्यायप्रविष्ट आहेत.
*  बदलापूर पूर्व ते पश्चिम जोडणारा उड्डाणपूल व तीन वर्षांपूर्वी शहरातील काही प्रमुख रस्ते रुंद झाले. याव्यतिरिक्त ठोस कामे झालेली नाहीत.
संकेत सबनीस, बदलापूर