कुलाबा ते सीप्झदरम्यान बांधण्यात येणाऱ्या ‘मेट्रो-३’ मार्गातील इमारतींवर येणाऱ्या गंडांतरामुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून बुधवारी आंदोलन केले. एमएमआरडीएच्या विरोधात करण्यात आलेल्या घोषणाबाजीने ठाकूरद्वार नाका दणाणून गेला. ‘रास्ता रोको’ आंदोलनामुळे अर्धा तास या परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती.
‘लोकसत्ता’च्या २८ जानेवारीच्या अंकात ‘मेट्रो-३ची मराठी टक्क्य़ाला धडक’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध होताच मुंबई सेंट्रल ते चिरा बाजार परिसरातील रहिवाशांमध्ये खळबळ उडाली. ‘मेट्रो-३’च्या मार्गालगतच्या इमारतींचे काय होणार हा रहिवाशांच्या चर्चेचा विषय बनला होता. दुपारी २च्या सुमारास या विरोधात ठाकूरद्वारच्या नाक्यावर गिरगावकर आणि शिवसैनिक मोठय़ा संख्येने जमले. एमएमआरडीए हाय हाय’, ‘मेट्रो-३चा मार्ग बदला’ अशा घोषणाबाजीने सारा परिसर दणाणून गेला. शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, माजी आमदार अरविंद नेरकर, नगरसेवक सुरेंद्र बागलकर, संपत ठाकूर आदींच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झाले. शिवसैनिक आणि रहिवाशांनी ठाकूरद्वार नाक्यावरच ठिय्या मांडला.
आंदोलनकर्त्यांशी पोलिसांनी चर्चा केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. ‘मेट्रो-३’ प्रकल्प होणे गरजेचे आहे, पण त्यासाठी या परिसरातील मूळ रहिवासी हद्दपार होता कामा नये. हा प्रकल्प कशा पद्धतीने राबविणार याची माहिती एमएमआरडीएने द्यावी. या प्रकल्पाआड येणाऱ्या इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन याच भागात व्हायला हवे किंवा ‘मेट्रो-३’ लोकवस्ती टाळून अन्य मार्गाने वळवावी. अन्यथा भाजप-शिवसेनेचे सरकार असले तरी शिवसैनिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा पांडुरंग सकपाळ आणि अरविंद नेरकर यांनी दिला आहे.

‘ मूळ जागीच पुनर्वसन’
‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३’ प्रकल्पाची उभारणी करताना स्थानिक रहिवाशांचे शक्यतो मूळ जागीच कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येईल. तोपर्यंत रहिवाशांना त्यांच्या हक्काच्या घरातून बाहेर काढण्यात येणार नाही. रहिवाशांच्या घरांबाबत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन म्हाडाशी चर्चा करीत आहे. तसेच याबाबत रहिवाशांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल, असे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून स्पष्ट करण्यात आले.  हा प्रकल्प भूमिगत असून प्रवेश-निकास आणि अन्य काही सुविधांसाठी मोकळ्या जागांची आवश्यकता आहे. बांधकामासाठी थोडय़ा अतिरिक्त जागेची तात्पुरत्या स्वरूपात आवश्यकता भासणार आहे. हा प्रकल्प व स्थानिक घरांची पुनर्बाधणी करण्याचे काम एकत्रितरीत्या करण्यावर भर देण्यात येत असून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन रहिवाशांशी चर्चा करणार आहे, असे एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी म्हटले आहे.