नगरपालिका निवडणुकांसाठी युतीवर शिक्कामोर्तब; सेनेच्या अटी भाजपला मान्य

परस्परांच्या राजकीय ताकदीला आव्हान देत उपसलेल्या स्वबळाच्या धमकीच्या तलवारी भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांनी गुरुवारी अखेर म्यान केल्या. मुंबई, ठाणे आदी ठिकाणच्या महानगरपालिका निवडणुकांची चाचणी परीक्षा मानल्या जाणाऱ्या नगरपालिकांच्या निवडणुका दोन्ही पक्ष एकत्रित, युतीने लढतील, असे गुरुवारी स्पष्ट झाले. शिवसेना नेतृत्वाने सातत्याने केलेली हेटाळणी, तसेच त्यांनी घातलेल्या अटींना दिलेली मान्यता बघता या संदर्भात भाजपने सेनेपुढे नमते घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

राज्यातील २१२ नगरपालिका व नगरपंचायत निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यानंतर काही काळातच महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका होतील. या निवडणुकांसाठी भाजप-शिवसेना युती होणार की नाही, याबाबत तर्क वितर्क चालू होते. उभय पक्षांच्या, विशेषत शिवसेनेच्या नेतृत्वाने याबाबत सातत्याने भाजपवर टीका चालवली होती. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात, तसेच नंतरच्या गोवा दौऱ्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर अत्यंत बोचरी टीका केली होती. त्या टीकेस भाजपच्या नेत्यांकडून सबुरीनेच उत्तर देण्यात येत होते. तीच सबुरी युतीचा निर्णय घेताना गुरुवारी दिसली!

‘राज्यातील नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी शिवसेना व भाजपने युती करण्याचा निर्णय घेतला आहे. युती करायची असल्यास ती सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करायची, ही शिवसेनेने घातलेली अट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मान्य केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली असून या स्थानिक स्वराज्य संस्थांपुरती युती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे’, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युती करण्याचा प्रस्ताव भाजपकडून आल्यानंतर बुधवारी व गुरुवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, विनायक राऊत, मिलींद नार्वेकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व अन्य नेत्यांनी चर्चा केली. मुख्यमंत्री फडणवीस व ठाकरे यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा झाल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले. उभय पक्षाच्या नेत्यांच्या चर्चेनंतर त्यांच्यात गुरुवारी पुन्हा चर्चा झाल्यावर युतीचा निर्णय अंतिम झाला व त्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली. ‘निवडणुका होत असलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती हवी, केवळ भाजपला सोयीच्या ठिकाणी नाही, अशी अट शिवसेनेने घातली; ती भाजपने मान्य केली’, असे राऊत म्हणाले. ‘जागावाटप करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर सोपविण्यात आला आहे. ज्या ठिकाणी जागावाटपात तिढा निर्माण होईल, त्याचा निर्णय राज्य पातळीवर करण्यात येणार आहे’, अशी माहितीही त्यांनी दिली.

मुंबई, ठाण्यात काय?

नगरपालिका निवडणुकांमध्ये युती झाली असल्याने आगामी मुंबई, ठाणे व अन्य महापालिकांच्या निवडणुकांमध्येही युती होणार का, यावर चर्चा सुरू झाली आहे. मात्र ही युती केवळ सध्या निवडणुका होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांपुरती मर्यादित आहे, असे स्पष्ट करीत, महापालिकांमध्ये ती होईल की नाही, याबाबत दोन्ही पक्षांतील वरिष्ठ नेत्यांनी साशंकता व्यक्त केली.

युती तोडायची असेल तर पाठीत वार करू नका. हिंमत असेल तर समोर या आणि युती तोडा. – -उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख (११ ऑक्टोबर)

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत शिवसेना सोबत आली तर ठीक. अन्यथा स्वबळावर लढू. – देवेंद्र फडणवीस,  मुख्यमंत्री (२३ ऑक्टोबर)