भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसकडून कोंडी

मराठा समाजाची खिल्ली उडविणारे व्यंगचित्र शिवसेनेच्या मुखपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या पाश्र्वभूमीवर मराठा समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटल्याने शिवसेनेला मंगळवारी बचावात्मक भूमिका घ्यावी लागली. दुसरीकडे भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने शिवसेनेची धोबी पछाड करण्याची संधी सोडली नाही.

शिवसेनेच्या मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्रावरून मराठा समाजात उमटलेल्या संतप्त प्रतिक्रियेनंतर मंगळवारी नवी मुंबई आणि ठाण्यात ‘सामना’ची कार्यालये लक्ष्य झाली. शिवसेनेला राजकीयदृष्टय़ा अडचणीत आणण्याकरिता भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मोहीमच हाती घेतली. मराठा समाजाची नाराजी हाताबाहेर जाऊ नये म्हणून सारवासारव करण्याची वेळ शिवसेनेवर आली. तसेच ‘सामना’तील व्यंगचित्र ही शिवसेनेची भूमिका नाही, असे सांगण्याची वेळ शिवसेनेवर आली.

मराठा समाजाची शिवसेनेच्या मुखपत्रातून टिंगलटवाळी करण्यात आली आहे. मराठा समाजाचा अवमान करणाऱ्या शिवसेनेने माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली. शिवसेनेच्या मुखपत्राच्या कार्यकारी संपादकांचे उपद्व्याप बघता त्यांनाच ‘कार्टून’ म्हणावे लागेल, अशी बोचरी टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी केली. यामागचा बोलविता धनी कोण आहे, असा संशय निर्माण करीत कार्यकारी संपादकांनी  मराठा समाजाची माफी मागावी, अशी मागणी शेलार यांनी केली. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत हे नेहमीच भाजपला लक्ष्य करतात, या वेळी भाजपने त्यांच्यावर टीका करीत परतफेड केली आहे.

सेनेचे काँग्रेस, राष्ट्रवादीवर खापर

‘सामना’च्या कार्यालयांवर झालेले हल्ले किंवा अन्य पक्षांनी शिवसेनेला लक्ष्य केल्याने मराठा समाजाची आणखी नाराजी नको म्हणून शिवसेनेच्या वतीने सारवासारव करण्यात आली. वातावरण सारे निवळले असताना राधाकृष्ण विखे-पाटील आणि धनंजय मुंडे या दोन विरोधी पक्षनेत्यांनी वातावरण पेटविल्याचा आरोप शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला. मराठा क्रांती मोर्चामध्ये फडकणारे भगवे झेंडे विखे आणि मुंडे यांना बघवत नसावेत. देसाई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात, मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला आहे, असे नमूद केले आहे. मराठा समाजाची नाराजी नको म्हणूनच शिवसेनेला मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाची आठवण करून द्यावी लागली. अन्यथा मुख्यमंत्री वा भाजपवर टीका करण्याची संधी न सोडणाऱ्या शिवसेनेला मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाचा आधार घ्यावा लागला.

माफी मागा-विखे-पाटील

या व्यंगचित्राबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाची माफी मागावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.