मुंबईत सर्वाधिक जागा आणि ठाण्यात एकहाती सत्ता मिळाली असली तरी नगरपालिकांपाठोपाठ जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेची चांगलीच पीछेहाट झाली आहे. या दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेना चौथ्या क्रमाकांवर मागे पडली आहे.

शिवसेनेचे नेतृत्व मुंबई वा ठाण्यापलीकडे लक्ष देत नाही, अशी टीका केली जाते. महानगरपालिका निवडणुकांच्या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई, ठाण्यापलीकडे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिकमध्ये महानगरपालिका निवडणुकांसाठी सभा घेतल्या. जिल्हा परिषदा निवडणुकांसाठी ग्रामीण भागात कुठेच सभा झाल्या नव्हत्या. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्येही शिवसेनेच्या नेतृत्वाने स्थानिक नेत्यांवरच सारी जबाबदारी सोपविली होती. वास्तविक राज्य विधानसभेवर निवडणुकीत निवडून आलेल्या ६३ आमदारांमध्ये सर्वाधिक आमदार हे ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागात शिवसेनेची घट्ट पाळेमुळे असली तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेची पीछेहाट झाली.

नोव्हेंबर महिन्यात झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये १९१ पैकी शिवसेनेचे २६ नगराध्यक्ष तर ६१२ सदस्य निवडून आले. निम्न शहरी भागात शिवसेना चौथ्या क्रमांकावर आहे. भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आले असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अनुक्रमके दुसरा व तिसरा क्रमांक मिळाला. जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला १८.५२ टक्के मते मिळाली. ग्रामीण भागांमध्ये भाजपला सर्वाधिक नंतर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि चौथ्या क्रमांकावर शिवसेना आहे.

रत्नागिरीमध्ये बहुमत

जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेत शिवसेनेने आपली सत्ता कायम राखली आहे. कोकणात शिवसेनेची पाळेमूळे घट्ट आहेत. मुंबईतही कोकणातील मतदारांची संख्या लक्षणिय असलेल्या प्रभागांमध्ये शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. रत्नागिरीमध्ये ५५ पैकी ३९ जागा जिंकून शिवसेनेने आपले वर्चस्व सिद्ध केले. रत्नागिरी वगळता शिवसेनेला एकहाती यश कोणत्याही जिल्ह्य़ांत मिळालेले नाही. यापूर्वी हिंगोलीमध्ये शिवसेनेची सत्ता होती, पण तेथेही शिवसेनेचा पराभव झाला. नाशिक जिल्हा परिषदेत शिवसेनेला सर्वाधिक २५ जागा मिळाल्या आहेत. ७३ सदस्यीय नाशिक जिल्हा परिषदेत सत्ता संपादनाकरिता अजून १२ सदस्यांची आवश्यकता लागणार आहे. नाशिक जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. भाजपने नाशिक शहर तसेच जिल्ह्य़ात सारी शक्ती पणाला लावली होती. पण नोटाबंदी, कांदे, द्राक्षे यांच्या दरावरून शिवसेनेने निर्माण केलेल्या वातावरणनिर्मितीचा राजकीय लाभ झाला.

मराठवाडय़ात शिवसेनेची चांगली ताकद आहे. पण यंदा मराठवाडय़ात भाजपने शिवसेनेला मागे टाकले आहे. औरंगाबादमध्ये भाजपचे २२ तर शिवसेनेचे १८ सदस्य निवडून आले आहेत. जालन्यातही भाजप पुढे आहे. मराठवाडय़ात शिवसेना मागे पडणे हे भविष्यातील राजकारणासाठी शिवसेनेच्या दृष्टीने चिंताजनक आहे. विदर्भात शिवसेनेला फार काही यश कधीच मिळत नाही. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्य़ांमध्ये शिवसेनेला खातेही खोलता आले नाही. यवतमाळमध्ये मात्र सर्वाधिक २० जागा  शिवसेनेला मिळाल्याने सारेच राजकीय पक्ष अचंबित झाले आहेत. यवतमाळ हा काँग्रेस व भाजपचा पारंपारिक बालेकिल्ला मानला जातो. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले होते. यवतमाळचे पालकमंत्रीपद शिवसेनेच्या संजय राठोड यांच्याकडे होते. पण अलीकडेच भाजपच्या मदन येरावार यांच्याकडे पालकमंत्रीपद सोपविण्यात आल्याने शिवसेनेने नाराजीही व्यक्त केली होती. यवतमाळमध्ये भाजपला १७, राष्ट्रवादीला १२ तर काँग्रेसला ११ जागा मिळाल्या आहेत. लोकसभेत या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व शिवसेनेच्या भावना गवळी करतात. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्यसंस्था मतदारसंघात शिवसेनेने विजय मिळविला होता. आता जिल्हा परिषदेत सर्वाधिक सदस्य निवडून आले आहेत.

महानगरपालिका निवडणुकांच्या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई, ठाण्यापलीकडे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिकमध्ये महानगरपालिका निवडणुकांसाठी सभा घेतल्या. जिल्हा परिषदा निवडणुकांसाठी ग्रामीण भागात कुठेच सभा झाल्या नव्हत्या. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्येही शिवसेनेच्या नेतृत्वाने स्थानिक नेत्यांवरच सारी जबाबदारी सोपविली होती.

  • मुंबईत सर्वाधिक ८४ जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत. तसेच अन्य नऊ महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला भाजपच्या पाठोपाठ यश मिळाले.
  • मुंबईत एकूण मतांच्या २९ टक्के तर अन्य नऊ महापालिकांमध्ये १८.१३ टक्के मते मिळाली. शहरी भागांमध्ये भाजपनंतर यश शिवसेनेला मिळाले आहे.
  • म्हणजेच शहरी भागांमध्ये शिवसेनेला मतदारांचा पाठिंबा असला तरी त्या तुलनेत ग्रामीण भागात शिवसेना पिछाडीवर आहे.
  • महानगरपालिका निवडणुकांमध्ये ठाण्यात शिवसेनेला बहुमत मिळाले. शिवसेना आणि ठाणे हे समीकरण कायम राहिले.