शनिवार २ मेची रात्र मुंबई पोलिसांच्या इतिहासातली काळी रात्र ठरली. नेहमीप्रमाणे गजबज असणाऱ्या वाकोला पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिर्के (५५) यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जोशी यांच्यावर गोळ्या झाडून स्वत: आत्महत्या केली. शिर्के यांच्या गोळीबारात वायरलेस ऑपरेटर अहिरसुद्धा जखमी झाले. जोशी यांचे रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. अजूनही वाकोला पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकारी या धक्क्यातून सावरले नाहीत.
  शुक्रवारी रात्री दोनदा बंदोबस्ताच्या ठिकाणी न आढळल्याने रात्रपाळीचे पोलीस निरीक्षक शिंदे यांनी शिर्के यांची डायरी नोंद केली होती. मी डय़ुटीवर हजर होतो असा दावा शिर्के यांनी केला होता. पण तरीही डायरीत नोंद केल्याचा राग आल्याने शनिवारी शिर्के वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जोशी (५२) यांना जाब विचारण्यासाठी गेले होते.
जोशी आणि शिर्के यांच्यात पूर्वीपासून वाद होताच. त्यांच्यात या मुद्दय़ावरून पुन्हा वाद झाला. दोनदा शिर्के त्यांच्या केबिनमध्ये गेले होते. साडेआठच्या सुमारास विलास जोशी बाहेर पडण्यासाठी निघाले. गाडी पोलीस ठाण्याच्या दारातच उभी होती. दार उघङून त्यांनी एक पाय गाडीत टाकला तेव्हा संतापलेल्या शिर्के यांनी अचानक येऊन अगदी जवळून आपल्या सव्‍‌र्हिस रिव्हॉल्वरमधून जोशी यांच्यावर गोळी झाडली. पहिली गोळी चुकली. तेव्हा दुसरी गोळी थेट कमरेच्या वर मारली. ते पाहून गाडीचा वायरलेस ऑपरेटर बाळासाहेब अहिर मदतीला आला तर त्याच्यावरही शिर्के यांनी गोळी झाडली ती अहिर यांच्या पायाला लागली. यानंतर शिर्के जोशी यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांच्या खुर्चीवर बसले आणि डोक्यात गोळी झाडली.
  अवघ्या काही सेंकदात हे रक्तरंजित नाटय़ घडले. जोशी आणि अहिर यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिर्के यांना व्ही.एन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरानंी मृत घोषित केले होते. जोशी यांच्या किडनीत गोळी रुतल्याने डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही. साडेबाराच्या सुमारास जोशी यांची प्राणज्योत मालवली.
अहिर यांच्या पायाला गोळी लागली असून एक शस्त्रक्रिया करून ती गोळी काढण्यात आली. त्यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे.

शिर्के यांची सहनशक्ती का संपली?
जेथे घटना घडली तेथील सीसीटीव्ही गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. गुन्हे शाखा ८ या प्रकरणाचा तपास करत आहे. शिर्के यांचा मुलगा अभिषेक याने आरोप केला आहे की शिर्के यांना वरिष्ठांकडून सतत त्रास होत होता. २०१२ साली त्यानी २८ दिवसांची आजारपणाची रजा काढली होती. त्याची चौकशी दोन वर्षांनी लावण्यात आली होती. त्यांना सतत दुय्यम दर्जाची कामे दिली जात होती. त्यामुळे ते घरी आल्यावर सतत झालेल्या अपमानाबद्दल आणि त्रासाबद्दल बोलत असायचे. शिर्के यांनी जोशी यांच्यासहीत आधीच्या दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांविरोधातही वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या. तर माझ्या आईनेही वरिष्ठांची भेट घेऊन तक्रार दाखल केली होती, असे अभिषेकने सांगितले. गेल्या दोन महिन्यांपासून बाबा अधिक तणावात होते. त्यांचा मानसिक छळ व्हायचा असा आरोप अभिषेकने केलाय.

शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार
जेजे रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर जोशी यांचा मृतदेह ताडदेव येथील त्यांच्या घरी आणला. तेथे काही वेळ अंत्यदर्शनासाठी तो ठेवण्यात आला होता. त्यांनतर दुपारी १ च्या सुमारास मरीन लाईन्स येथील चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस महासंचालक संजिव दयाल, पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शिर्के यांच्यावर वांद्रे येथील खेरवाडी स्माशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तेथे पोलीस अमलदार आणि पोलीस कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.