नितीशकुमार पक्ष वाढविण्याच्या प्रयत्नात; संघटनाबांधणी सुरू

समाजवादी चळवळीची थोर परंपरा असलेल्या महाराष्ट्रात प्रजा समाजवादी पार्टी, सोशालिस्ट पार्टी, जनता पक्ष, जनता दल अशा तत्कालिक राजकीय पक्षांनी राज्याच्या राजकारणात वेळोवेळी प्रभाव पाडला किंवा एक ताकद निर्माण केली होती. पण गेल्या दहा वर्षांपासून राज्यात जनता दलाची पार पीछेहाट झाली. आता ही जागा घेण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जनता दल (युनायटेड) पक्ष सरसावला आहे.

गेल्या शनिवारी मुंबईत झालेल्या मेळाव्यात महाराष्ट्रात जनता दल (युनायटेड) पक्षाचे संघटन वाढविण्याचे नितीशकुमार यांनी जाहीर केले. मुंबई शिक्षक मतदारसंघातील आमदार कपिल पाटील यांनी नितीशकुमार यांच्या पक्षात प्रवेश केला. त्यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. राज्यात सध्या देवेगौडा यांच्या नेतृत्वाखाली जनता दल (से) अस्तित्व आहे. अलीकडेच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत गडहिंग्लजमध्ये माजी प्रदेशाध्यक्ष श्रीपती शिंदे यांची कन्या नगराध्यक्षपदी निवडून आली. हा अपवाद वगळता पक्षाला छोटे-मोठे यश मिळाले. पुढील महिन्यात होणाऱ्या मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत जनता दलाला यश मिळू शकते का, याची सध्या चर्चा सुरू आहे. निहालभाई अहमद यांच्या निधनानंतर मालेगावमध्ये जनता दलाची ताकद कमी झाली. त्यांच्या मुलाकडे आता नेतृत्व असले तरी स्थानिक मतदार कितपत स्वीकारतात, याबाबत अद्याप अंदाज आलेला नाही. पण सध्या तरी महापालिका निवडणुकीच्या सत्तेच्या स्पर्धेत जनता दल (से) पक्ष नाही.

राज्याच्या राजकारणात एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, जॉर्ज फर्नाडिस, मधू लिमये, मधू दंडवते, मृणालताई गोरे, निहाल अहमद, बापू काळदाते, भाई वैद्य, ग. प्र. प्रधान, दत्ताजी ताम्हाणे, पन्नालाल सुराणा आदी समाजवादी चळवळींचे नेते झाले. समाजवादी विचारांच्या नेत्यांनी राज्य विधिमंडळांची उभय सभागृहे गाजविली. महाराष्ट्रात काँग्रेसचे एकहाती वर्चस्व असताना समाजवादी आणि शेकाप हे दोन पक्ष विरोधकांची भूमिका पार पाडत. शरद पवार यांचे वसई-विरारमधील २८५ भूखंडांचे श्रीखंड हे प्रकरण मृणालताई गोरे आणि पा. बा. सामंत या नेत्यांनीच बाहेर काढले होते.

हळूहळू समाजवादी विचारसरणी अस्तगत होत गेली. राज्य विधिमंडळांमध्ये १९५७ ते २००४ या काळात समाजवादी विचारसरणीचे आमदार मोठय़ा प्रमाणावर निवडून येत असत. २००४ पासून मात्र जनता दलाचा एकही आमदार निवडून आलेला नाही. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील जनता दल (से) कार्यरत असला तरी पक्षाला निवडणुकीच्या राजकारणात फारसा पाठिंबा मिळालेला नाही किंवा पक्षाचा तेवढा प्रभावही राहिलेला नाही. ही जागा घेण्याचा नितीशकुमार यांचा प्रयत्न आहे.

बिहारमध्ये मधू लिमये यांनी काम केले आहे. नितीशकुमार यांचा राज्याच्या राजकारणात प्रभाव पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बिहारमध्ये दारूबंदी करून नितीशकुमार यांनी वेगळा आदर्श घालून दिला. शनिवारी मुंबईत झालेल्या मेळाव्यात नितीशकुमार यांनी, दारूबंदीच्या मुद्दय़ाला स्पर्श केला. मोदींना पर्याय देण्याच्या दृष्टीने त्यांनी  संघटन वाढविण्यावर भर दिला आहे.