इमारतीच्या उंचीबाबत विमानतळ प्राधिकरणाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळविताना विकासकाने चक्क खोटी माहिती पुरविल्याचे स्पष्ट झाल्याने आता प्राधिकरणाने याआधी दिलेली परवानगी रद्द केली आहे. विमानतळ प्राधिकरणाने अशा पद्धतीने एनओसी रद्द करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे दोन हजार झोपुवासीयांचा आठ वर्षे रखडलेला प्रकल्प अडचणीत आला आहे. एकाही झोपुवासीयांचे नीट पुनर्वसन होऊ शकलेले नसून यापैकी तब्बल १५०० रहिवासी दूरवर असलेल्या संक्रमण शिबिरात राहत आहेत. विशेष म्हणजे या प्रकल्पाची महापालिकेतील फाइल गायब झाल्याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अंधेरी पूर्वेला गुंदवली परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गाला लागून असलेल्या मोक्याच्या जागेवरील महाकाली दर्शन झोपु प्रकल्प २००६ मध्ये मे. सनशाइन बिल्डर्स अँड डेव्हलपर्सने राबविण्यास सुरुवात केली. सुमारे दोन हजार झोपुवीसायांसाठी नऊ इमारती बांधल्या जाणार होत्या. त्यापैकी चौदा माळ्याच्या तीन इमारती बांधून पूर्ण झाल्या आहेत तर उर्वरित इमारतींचे बांधकाम सुरू आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून मे २०११ मध्ये ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आले. मात्र एनओसी घेण्यासाठी जी कागदपत्रे विकासकाकडून सादर करण्यात आली ती बनावट असल्याचे प्राधिकरणाच्या चौकशीत लक्षात आले. त्यानंतर ही एनओसी रद्द करण्यात आल्यामुळे या प्रकल्पाचे भवितव्यच धोक्यात आले आहे.
या संदर्भात प्राधिकरणाने सदर एनओसी रद्द करीत असल्याचे पत्र सहमहाव्यवस्थापक एस. के. दासगुप्ता यांच्या सहीनिशी जारी केले आहे. या पत्रात दासगुप्ता यांनी म्हटले आहे की, या प्रकल्पात आणखी उंची मिळावी, यासाठी अपील करण्यात आले आहे. परंतु पूर्वी दिलेल्या एनओसीसंदर्भातील कागदपत्रांची तपासणी केली असता महापालिकेने दोन वेळा दिलेल्या प्रमाणपत्रांनुसार मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीने शहानिशा केली असता त्यात घोळ असल्याचे आढळून आले. त्यामुळेच एनओसी रद्द करण्यात आल्याचे या पत्रात म्हटले आहे.
एनओसी रद्द झाल्याने संपूर्ण प्रकल्पच धोक्यात आला आहे. मूळ विकासक राकेश सेठ यांच्याऐवजी नंतर शिरकाव केलेल्या दोघा भागीदारांनी हा प्रकल्प एका बडय़ा उद्योगसमुहाला ३०० कोटींना विकल्याचे कळते.
अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या प्रकल्पाला विमानतळ प्राधिकरणाकडून हिरवा कंदील न मिळाल्याने आता झोपुवासीयांना निवारा मिळण्यातच अडचण निर्माण झाली आहे. याबाबत झोपु प्राधिकरणाशी संपर्क साधला असता, सदर प्रकल्पासाठी विमानतळ प्राधिकरणाने एनओसी रद्द केल्याचे मान्य करण्यात आले. या प्रकरणी महापालिकेने गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव देबाशीष चक्रवर्ती यांना पत्र लिहून झोपु प्राधिकरणाला कारवाईचे आदेश देण्याबाबत कळविण्यात आले आहे.

विमानतळ प्राधिकरणाने एनओसी रद्द करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे दोन हजार झोपुवासीयांचा आठ वर्षे रखडलेला प्रकल्प अडचणीत आला आहे.