वेतनवाढीच्या मागणीवरून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला मध्यरात्रीपासून सुरूवात झाली आहे. ऐन सणासुदीत राज्यभर एसटी सेवा बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होण्यास सुरूवात झालीय. विविध एसटी कामगार संघटनांनी या संपाला पाठिंबा दिला आहे. दिवाळीत होत असलेल्या या संपाने एसटी प्रशासनाची कोंडी होण्याची शक्यता आहे.

 

सातवा वेतन आयोग लागू करावा, पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनेकडून हा संप पुकारण्यात आलाय. जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वेतनाबद्दल सुधारित करार होत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांना २५ टक्के हंगामी वाढ देण्यात यावी, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. मात्र या निवेदनाला मुख्यमंत्र्यांनी कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला.

 

आज सकाळपासून राज्यातील अनेक डेपोंमधून सुटणाऱ्या गाड्या बाहेर पडलेल्या नाहीत. त्यामुळे दिवाळीनिमित्त गावाकडे आणि इतरत्र जाणाऱ्या प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. मुंबईतील परळ आणि पुण्याच्या स्वारगेट आगारातून देखील आज एकही एसटी बाहेर पडलेली नाही. अहमदनगरला एसटी कामगार संघटनांनी मध्यरात्रीपासून चक्का जाम पुकारला आहे. कामगारांच्या संपाने ऐन दिवाळीत जिल्ह्यातील एसटी वाहतूक ठप्प झाली आहे. सर्व गाड्या आगारातच उभ्या आहेत. एसटी कर्मचारी आगारात जमले असून अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस देखील दाखल झाले आहेत. बसस्थानक व आगारांमध्ये वाहनांचे नुकसान होऊ नये, कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडविले जाऊ नये यासाठी पोलिसांची मदत घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच, सर्व एसटी आगार व स्थानकांमध्ये होणाऱ्या सर्व घटनांचे चित्रि‌‌करणही करण्यात येणार आहे.

खासगी बसेसची मदत
एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपकाळात सर्व खासगी प्रवासी बस, शालेय बस, खासगी बस व मालवाहू गाड्यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता दिली आहे.

Live updates:

*बीड आणि अंबाजोगाईमध्ये परिवहनमंत्री दिवाकर रावतेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
*कागल परिसरात एसटीवर अज्ञातांची दगडफेक
* एसटी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे स्वारगेट आगारात दाखल
* एसटी कामगारांच्या मागण्या रास्त आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यात लक्ष घालून तातडीने निर्णय घ्यावा- सुप्रिया सुळे
* ठाण्यातही एसटीचा कडकडीत बंद, ठाणे डेपोतून केवळ एक बस तर शहापूर आगारामधून दोन बसेस सुटल्या
* पुण्यात एसटी कर्मचाऱ्यांचा शंभर टक्के बंद, आगारात शुकशुकाट