मुंबईसह राज्यभर सध्या थैमान घालत असलेला डेंग्यू हा संसर्गजन्य नसल्याने तो काही गंभीर आजार नाही. त्यामुळेच त्याला गंभीर आजार म्हणून जाहीर करण्याची गरज नसून उलट तो आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना लोकांकडूनच प्रतिसाद दिला जात नसल्याचा दावा राज्य सरकारतर्फे गुरुवारी उच्च न्यायालयात करण्यात आला. त्यावर न्यायालयानेही डेंग्यूला अटकाव करायचा तर लोकांनीही भोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्याची गरज असल्याचे म्हटले.
मुंबईमध्ये सध्या मोठय़ा प्रमाणावर पसरलेल्या डेंग्यू-मलेरियाला गंभीर आजार वा साथीचा आजार म्हणून जाहीर करावे आणि ही साथ रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आदेश सरकार-पालिकांना द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका नवी मुंबईतील विष्णू गवळी यांनी केली आहे. न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर त्यावर सुनावणी झाली. त्या वेळेस डेंग्यू हा संसर्गजन्य नसल्याने गंभीर आजार नाही. डेंग्यू झालेली व्यक्ती योग्य उपचाराने ठणठणीत बरी होऊ शकते. त्यामुळे डेंग्युला गंभीर आजार जाहीर करण्याची गरज नसल्याचा दावा राज्य सरकारच्या वतीने अ‍ॅड. गौरी राव यांनी न्यायालयात केला. यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र शुक्रवारी न्यायालयात सादर करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.  दरम्यान, या प्रकरणी मुंबई महापालिकेला प्रतिवादी करण्याचे निर्देश याचिकाकर्त्यांला दिले.

पालिकेने यापूर्वीच ३७.५ कोटी रुपये बेस्टला दिले आहेत, तर दुसऱ्या हप्त्यातील ३७.५ कोटी रुपये देण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली असून शुक्रवारी संध्याकाळपर्यंत ही रक्कम बेस्टच्या तिजोरीत जमा होईल. उर्वरित रक्कमही लवकरच बेस्टला देण्यात येईल.
यशोधर फणसे, स्थायी समिती अध्यक्ष

प्रवासाच्या टप्प्यांत फेरबदल
या अर्थसंकल्पात पूर्वीच्या तुलनेत तीन टप्पे कमी करण्यात आले आहेत. सध्या ५० किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्यासाठी प्रवाशांना ४० रुपये मोजावे लागत आहेत. १ फेब्रुवारीपासून ५० किलोमीटर प्रवासासाठी ५० रुपये मोजावे लागणार आहेत. पूर्वी सुरुवातीच्या दोन किलोमीटरनंतर बसभाडय़ासाठी दुसरा टप्पा तीन किलोमीटरचा होता. आता तो चार किलोमीटर करण्यात आला आहे.

पालिकेने येत्या तीन महिन्यांमध्ये १५० कोटी रुपये बेस्टला दिल्यास १ फेब्रुवारीपासून होणारी बस भाडेवाढ टळू शकेल. मात्र बेस्टला तोटय़ातून सावरण्यासाठी १ एप्रिलपासून किमान भाडय़ात १ रुपयाची वाढ करावीच लागेल. पालिकेकडून १५० कोटी रुपये मिळाल्यास १ फेब्रुवारीसाठी सूचित केलेले भाडेपत्रक १ एप्रिलपासून लागू करण्यात येईल.
-ओमप्रकाश गुप्ता, बेस्ट महाव्यवस्थापक

पालिका म्हणते, नोव्हेंबरमध्ये ८१ डेंग्यू रुग्ण
डेंग्यूच्या मृत्यूच्या घटना रोज समोर येत असताना पालिका मात्र आकडय़ांशी खेळ करत डेंग्यूची साथ कमी झाल्याचे दाखवत आहे. डेंग्यूला नोटिफाएबल करण्याबाबत सरकारी आदेश नसल्याच्या कारणाची ढाल पुढे करत खासगी रुग्णालयांकडून मिळत असलेली माहिती देण्यास पालिकेचे आरोग्य अधिकारी टाळाटाळ करत आहेत. डेंग्यूच्या मृत्यूंची संख्याही दहावर गेली नसून इतर संशयित मृत्यूंबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी सारवासारव केली जात आहे.
ऑक्टोबर महिन्यात पालिकेच्या रुग्णालयात डेंग्यूचे २१३ रुग्ण दाखल होते. तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात ४० व दुसऱ्या आठवडय़ात ४१ रुग्ण दाखल झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. गेल्या नोव्हेंबरमध्ये पालिका रुग्णालयात डेंग्यूचे ९६ रुग्ण दाखल होते. त्यातुलनेत दोनच आठवडय़ांत पालिकेतील रुग्णांची संख्या ८१ वर पोहोचली आहे.