परीक्षेत उत्तरे लिहिताना चित्रपटातील पात्रांचा आधार; संमिश्र प्रतिक्रिया

एखाद्या लोकप्रिय चित्रपटाचा प्रभाव आपल्या समाजावर किती असतो हे तो चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरचा तरुणाईचा पेहराव, बोलण्यात सतत येणारी चित्रपटाची वाक्ये यातून जाणवत असे. पण चित्रपटाचा हा प्रभाव थेट विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेमध्ये झळकू लागला आहे. शाळांमध्ये पार पडलेल्या परीक्षेत काही विद्यार्थ्यांनी चित्रावरून गोष्ट रचताना ‘सैराट’ चित्रपटातील पात्रांचा आधार घेतला, तर काहींनी शब्दाचा अर्थ सांगून वाक्प्रचार करा यामध्येही सैराट चित्रपटातील त्यासंदर्भातील दृश्ये उतरविली आहेत. या उत्तरपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपवरून सर्वत्र पसरल्या आहेत. यामुळे ही ‘सैराट उत्तरे’ सध्या समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरली आहेत.

एखाद्या विद्यार्थ्यांने शाळेत चित्रपटाचे किंवा नायक-नायिकेचे नाव घेतले तरी त्याच्याकडे  प्रश्नांकित नजरेने पाहिले जात असे. मात्र हाच विद्यार्थी आता थेट उत्तरपत्रिकांमध्ये चित्रपटातील पात्रांचा आधार घेऊन उत्तरे लिहू लागला आहे. या विद्यार्थ्यांनी लिहिलेली ही उत्तरे सध्या समाज माध्यमांवर चर्चेचा आणि विनोदाचा विषय बनला आहे. अनेकांनी त्यावरून आपल्या शिक्षकांच्या बुद्धिमत्तेची कुवत काढण्यासही कमी केलेले नाही. समाजमाध्यम याकडे टीकेच्या किंवा विनोदी दृष्टीने पाहात असले तरी शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांच्या दृष्टीने मात्र हा सकारात्मक बदल आहे.

लोकप्रिय चित्रपटांचा प्रभाव हा समाजजीवनावर जाणवणे हे फार पूर्वीपासून घडते आहे. यात नवीन गोष्ट आहे ती म्हणजे तो प्रभाव थेट उत्तरपत्रिकांपर्यंत आला आहे. यामागे सध्याची विद्यार्थी आणि शिक्षकांची पाठय़पुस्तकाबाहेर डोकावण्याची स्थिती कारणीभूत असल्याचे निरीक्षण बहिरवाडी येथील जि. प. शाळेचे शिक्षक भाऊसाहेब चासकर यांनी नोंदविले.  तर आपल्या शिक्षण पद्धतीत झालेल्या बदलांमुळे विद्यार्थ्यांना वेगळा विचार करण्यास भाग पाडत आहे, यामुळे विद्यार्थ्यांनी चित्रपटांतील पात्रांचा नामोल्लेख करत एखादी गोष्ट रचणे याचे आपण स्वागतच केले पाहिजे, असे मत चेंबूर येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयातील मराठी शिक्षक अनिल बोरनारे यांनी नोंदविले.  आपल्या शिक्षण पद्धतीत उपलब्ध असलेली साधने ही आजही अपुरी असून त्यामुळे शिक्षणाव्यतिरिक्त इतर आकर्षणांकडे मुले वळत असल्याचे ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांनी सांगितले.

उच्च शिक्षणातही प्रभाव

यंदा ज्या वेळेस आम्ही शाखा बदलून मराठीत पदव्युत्तर पदवी घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली तेव्हा आम्हाला माझा आवडता चित्रपट किंवा माझी आवडती कलाकृती या निबंध लेखनामध्ये सैराट चित्रपटावर लिहिलेले प्रकर्षांने जाणवल्याचे मुंबई विद्यापीठातील मराठीच्या प्रा. भारती निरगुडकर यांनी स्पष्ट केले. लोकप्रिय चित्रपट किंवा कलाकृतींवर लिखाण करणे विद्यार्थ्यांना सोपे जात असल्याने ते अशा विषयांची निवड करत असल्याचेही त्या म्हणाल्या.