दररोज २० हजार टन वाहतूक; तिपटीने वाढ

नवरात्री, दसरा आणि दिवाळी हे तीनही सण देशभरात उत्साहाने साजरे होणार असल्याने गोडाधोडाचे पदार्थही तेवढय़ाच मोठय़ा प्रमाणात तयार होऊ घातले आहेत. या पदार्थासाठी साखरेची प्रचंड मागणी असून सणासुदीच्या काळामध्ये रेल्वेसाठी ही साखर ‘गोड’ ठरत आहे. महाराष्ट्रात असलेल्या मोठय़ा साखर कारखान्यांमधून उत्तरेकडे निर्यात होणाऱ्या साखरेच्या प्रमाणात गेल्या दहा दिवसांमध्ये तब्बल तिपटीने वाढ झाली आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमधून दर दिवशी अंदाजे १६ ते २० हजार टन साखर उत्तरेकडील विविध राज्यांमध्ये पाठवली जात आहे. त्यापोटी मध्य रेल्वेला दर दिवसाला पाच कोटींच्या आसपास महसूलही मिळत आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच नवरात्रीची सुरुवात होणार आहे. यंदा पाऊसपाणी उत्तम झाल्याने त्यानंतर येणारा दसरा आणि दिवाळी देशभरात उत्साहाने साजरी होणार आहे. त्यासाठी गोडाधोडाचे पदार्थ व मिठाई यांची विक्रीही वाढणार आहे. या सणासुदीच्या दिवसांमध्ये साखरेच्या दरांवर नियंत्रण राहावे, यासाठी राज्य सरकारने सर्व साखर कारखान्यांना दिलेल्या आदेशानुसार या साखर कारखान्यांना २० टक्क्यांपेक्षा जास्त साठा करता येणार नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील बडय़ा साखर कारखान्यांनी आपल्याकडील साखरेच्या साठय़ाची निर्यात सुरू केली आहे.

दहा दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रातून एक किंवा दोन मालगाडय़ा साखर घेऊन उत्तरेकडे जात होत्या. सध्या या गाडय़ांची संख्या सहा ते सात एवढी आहे. विशेष म्हणजे साखर वाहतुकीच्या वाढत्या मागणीमुळे रेल्वेला सिमेंट वाहतूक थांबवून साखरेला प्राधान्य द्यावे लागत आहे. प्रत्येक मालगाडीतून २८०० टन साखरेची वाहतूक होते. दर दिवशी मध्य रेल्वे १६ ते २० हजार टनांची साखर वाहतूक करत आहे.  ही साखर बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, गुवाहाटी आदी भागांमध्ये जात असून गुवाहाटीपर्यंत साखर पोहोचवण्यासाठी रेल्वेकडून ६५ ते ७० लाख रुपये आकारले जातात.

  • दर दिवशी साखरेची वाहतूक करणाऱ्या मालगाडय़ा – ६-७
  • एका मालगाडीतून वाहून नेली जाणारी साखर – २८०० टन
  • दर दिवशी साखरेची एकूण वाहतूक – १६ ते २० हजार टन
  • मालगाडीला गुवाहाटीपर्यंत येणारा खर्च – ६५ ते ७० लाख
  • प्रति किलो साखर वाहतुकीचा खर्च – २ ते ३ रुपये