पावसाळ्यानंतर १४ हजार झोपडय़ांवर कारवाईची मोहीम

पावसाचे वाहून नेणारे मुंबईमधील नाले अतिक्रमणामुळे आक्रसले असून पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे ३५ किलोमीटर लांबीच्या नाल्यांवरील तब्बल १४ हजार झोपडय़ा पावसाळ्यानंतर तोडण्याची मोहीम पालिकेतर्फे राबविण्यात येणार आहे.

मुंबई ४५० कि.मी. क्षेत्रफळावर पसरली आहे. पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या दीड मीटर रुंदीचे २५० कि.मी. लांबीचे, तर दीड मीटपेक्षा कमी रुंदीचे ४५० कि.मी. लांबीचे नाले मुंबईत आहेत. तसेच ६०० कि.मी. लांबीच्या पेटीका (ड्रेन)वाहिन्यांमधूनही पाणी वाहून जाते. मुंबईतील नाल्यांची एकूण लांबी विचारात घेतली तर ती तब्बल १३०० ते १४०० कि.मी. होते. त्याशिवाय रस्त्यालगत तब्बल २००० कि.मी. लांबीची गटारे आहेत. तर नाल्यांतून वाहून जाणारे पावसाचे पाणी १७५ पातमुखांमधून समुद्राला जाऊन मिळते. हे नाले आणि पातमुखांची साफसफाई करण्याची जबाबदारी पालिकेची आहे.

पावसाच्या पाण्याचा झटपट निचरा व्हावा यासाठी पालिकेने दारुखाना परिसरामध्ये बांधलेल्या ब्रिटानिया पर्जन्य जल उदंचन केंद्राचा लोकार्पण सोहळा बुधवारी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी ही माहिती दिली.

पालिकेने हाजीअली, क्लिव्हलॅण्ड, लव्हग्रो, ईर्ला येथे उदंचन केंद्रे उभारले असून आजपासून ब्रिटानिया पर्जन्य जल उदंचन केंद्र कार्यान्वित करण्यात येत आहे. चार-पाच महिन्यांमध्ये गझदरबांध उदंचन केंद्राचे काम सुरू होण्याची शक्यता आहे.

माहुल उदंचन केंद्रासाठी मिठागराची जागा ताब्यात मिळावी यासाठी सरकारबरोबर बोलणी सुरू असून मोगरा उदंचन केंद्रासाठी पर्यावरणाबाबतची परवानगी मिळायची आहे. हिंदमाता आणि आसपासच्या तब्बल ६३० हेक्टर क्षेत्रातील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची क्षमता ब्रिटानिया पर्जन्य जल उदंचन केंद्राची आहे. त्यासाठी ५५ कि.मी. लांबीच्या पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे उभारण्यात आले आहे. त्यामुळे हिंदमाता आणि आसपासच्या सखलभागांमध्ये साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा झटपच निचरा होईल. गेल्या वर्षी ४० मि.मी. पाऊस पडला होता. त्यावेळी हिंदमाता परिसरात १८ तास पाणी साचले होते.

गेल्या चार दिवसांमध्ये ६० मि.मी. पाऊस पडल्यानंतर सहा इंच पाणी साचले होते. मात्र दोन तासामध्ये त्याचा निचरा झाल्याची माहिती  देऊन नाल्याकाठी उभ्या असलेल्या वस्तीमधून नाल्यातच मोठय़ा प्रमाणावर कचरा टाकण्यात येतो.

नाला पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी आहे. त्याची कचराभूमी करू नका. कचरा एका बाजूला ठेऊन द्यावा, पालिकेची माणसे तो घेऊन जातील. नाल्यात कचरा टाकू नये यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

जलवाहिन्यांची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न

एका तासात पडणाऱ्या २५ मि.मी. पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता मुंबईतील पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये आहे. परंतु, पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता ५० मि.मी. पावसाचे पाणी वाहून नेण्याइतकी करण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यासाठी मुंबईतील ३५ कि.मी. लांबीच्या नाल्यांचेही रुंदीकरण करण्यात येणार आहे. या नाल्यांवर तब्बल १४ हजार झोपडय़ा उभ्या असून त्या पावसाळ्यानंतर हटविण्यात येतील. तसेच झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसनही करण्यात येईल, अशी माहिती अजोय मेहता यांनी दिली.