दरवर्षी १ मे रोजी रिक्षा-टॅक्सी यांच्या भाडय़ात वाढ करण्याची हकीम समितीची शिफारस असताना गेल्या १ मे रोजी ही वाढ न झाल्याने आता निवडणुकीच्या निकालानंतर भाडेवाढीची मागणी करण्यात येणार आहे. त्यामुळे नवे सरकार स्थापन झाल्यानंतर, नव्या पंतप्रधानांनी शपथग्रहण केल्यानंतर लगेचच मुंबईकरांना रिक्षा व टॅक्सी भाडेवाढीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. रिक्षेच्या भाडय़ात किमान दोन ते कमाल पाच रुपयांची वाढ व्हावी, अशी मागणी रिक्षा संघटना करणार आहेत.
वाढता महागाई दर, इंधनाचा वाढता दर, देखभाल दुरुस्तीचा खर्च, राहणीमान खर्च या सर्व घटकांचा विचार करून दरवर्षी १ मे रोजी रिक्षा-टॅक्सी यांच्या भाडय़ात वाढ केली जावी, अशी शिफारस हकीम समितीने आपल्या अहवालात २७ जुलै २०१२ रोजी केली होती. या शिफारशीनुसार ऑक्टोबर २०१२पासून रिक्षा व टॅक्सी यांचा पहिला टप्पा १.५ किलोमीटर एवढा केला होता. त्यानुसार रिक्षाच्या पहिल्या टप्प्यासाठी १५ रुपये आणि टॅक्सीसाठी १९ रुपये किमान भाडे आकारण्याचे ठरवले होते. मात्र ऑक्टोबर २०१२पासून आतापर्यंत सीएनजीच्या भाडय़ात पाच रुपयांनी वाढ झाली आहे.
 गेल्या वर्षीही याच दरम्यान रिक्षा संघटना आणि परिवहन विभाग यांच्यात या विषयावरून खडाजंगी झाली होती. यंदा निवडणुकांचा हंगाम असल्याने सत्ताधारी पक्षांना भाडेवाढ करून टीकेचे धनी होणे परवडणारे नाही. मात्र काही रिक्षा व टॅक्सी संघटनांनी भाडेवाढीबाबत सरकारशी पत्रव्यवहारही सुरू केला आहे. देशभरात निवडणुकांचे वातावरण असल्याने १ मे रोजी भाडेवाढीबाबत कोणताही निर्णय घेणे शक्य झाले नव्हते. मात्र आता १६ मे रोजी निकाल लागल्यानंतर ही मागणी पुढे करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबईकरांना भाडेवाढीला सामोरे जावे लागणार आहे.